सहा महिन्यांत काढा २५ हजार पीएमसी बँक खातेधारकांना दिलासा

Mumbai
PMC Bank
पीएमसी बँक

आर्थिक निर्बंध लादलेल्या पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) खातेधारकांना रिर्झव्ह बँकेने पुन्हा दिलासा दिला आहे. खातेधारकांना सहा महिन्यांत आपल्या खात्यातून आता २५ हजार रुपये काढता येणार आहेत. तसे निर्देश आरबीआयकडून देण्यात आले आहेत.

आर्थिक निर्बंध लादल्यानंतर खातेधारकांना पीएमसी बँकेतून सहा महिन्यात केवळ १ हजार रुपये काढण्याची परवानगी आरबीआयने दिली होती. मात्र खातेधारकांचा रोष पाहता आरबीआयने ती मर्यादा १० हजार रुपयांपर्यंत वाढवली. तरीही बँकेचे खातेधारक नाराज होते. खात्यातून अधिक पैसे काढण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी खातेधारकांकडून होत होती. अखेर गुरुवारी आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा वाढली. त्यानुसार आता खातेधारकांना सहा महिन्यात २५ हजार रुपये आपल्या खात्यातून काढता येणार आहेत.

ज्यांनी यापूर्वी एक हजार, १० हजार रुपये काढले असतील त्यांना आता १४ हजार रुपये पीएमसी बँकेतील आपल्या खात्यातून काढता येणार आहेत.

एचडीआयएलच्या संचालकांना अटक
पंजाब, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक (पीएमसी बँक) घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी एचडीआयएल कंपनीवर कारवाई केली. कंपनीचे संचालक सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांची ३५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाचही आणली आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापकीय मंडळ आणि एचडीआयएल कंपनीच्या पवर्तकांविरुद्ध खटला दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष तपासणी पथक याप्रकरणी तपास करत आहे.