घरमहाराष्ट्रअलिबाग समुद्र किनार्‍यावरील बंधार्‍याला भगदाड

अलिबाग समुद्र किनार्‍यावरील बंधार्‍याला भगदाड

Subscribe

येथील समुद्र किनार्‍याच्या सौंदर्यात भर घालणारा पत्तन विभागाने बांधलेला बंधारा समुद्रातून येणार्‍या लाटांच्या तडाख्याने फुटला आहे. या बंधार्‍याला अनेक ठिकाणी भगदाडे पडली असून, त्यावरील पदपथही ढासळू लागला आहे. 650 मीटर लांबीच्या या बंधार्‍यासाठी ११ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

पत्तन विभागाने किनार्‍यावर गॅबियन पद्धतीचा हा बंधारा बांधला आहे. २०११ साली या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. २०१४ साली बंधार्‍याचे बांधकाम पूर्ण झाले. 650 मीटर लांबीच्या या बंधार्‍यासाठी ११ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. सिमेंटचे ब्लॉक्स, लोखंडी जाळीच्या साह्याने हा बंधारा बांधण्यात आला आहे. यावर सिमेंट पदपथ बांधण्यात आला. समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने बंधार्‍याची लोखंडी जाळी तुटण्यास सुरुवात झाली. सिमेंटचे ब्लॉक बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या तारा अज्ञातांनी कापून नेल्या आहेत. बंधार्‍यासाठी रचलेले ब्लॉक आता ढासळण्यास सुरवात झाली आहे. यामुळे बंधार्‍यावर उभारण्यात आलेला सिमेंटचा पदपथही निकामी होण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

देश-विदेशी पर्यटकांना भावणार्‍या या किनार्‍याच्या सौंदर्यात भार घालणारा हा बंधारा आहे. बंधार्‍याचे काम पत्तन विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र नगर पालिकेकडूनही बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. पत्तन विभागाने बंधार्‍याची तातडीने दुरुस्ती करायला हवी, असे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.

बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी एक ते दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र विभागाकडे सध्या त्यासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या कामाच्या अर्थसंकल्पयीय तरतुदीसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
-नीलेश चोरे, सहाय्यक अभियंता, पत्तन विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -