घरमहाराष्ट्रवाढत्‍या तापमानामुळे चुकतोय हृदयाचा ठोका!

वाढत्‍या तापमानामुळे चुकतोय हृदयाचा ठोका!

Subscribe

चिंताजनक मधुमेह, उच्च रक्तदाब

मुंबईकरांनी हवी तेवढी थंडी अनुभवल्यानंतर आता मुंबईतील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल जाणवू लागले आहेत. हे बदलते वातावरण मुंबईकरांचा घामटा काढत आहे. कारण, मुंबईच्या तापमानात वाढ झाली असून गेल्या आठवड्यापासून ३१ ते ३५ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या बदलत्या वातावरणाचा आणि ऋतूचा मुंबईकरांना ताप झाला असून सकाळपासून कामानिमित्त बाहेर पडणारे मुंबईकर घामाने चिंब होत आहेत. अशातच ज्यांना हृदयविकाराचे आजार असतील त्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर्स करत आहेत. मधुमेह, उच्चरक्तदाब आणि इतर हृदयासंबंधित असलेल्या विकारांच्या रुग्णांनी या वातावरणात बाहेर पडताना आपल्यासोबत पाण्याची बॉटल ठेऊन प्रवास करण्याचे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यापासून नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यातही थंडीचा अनुभव घेतला. पण, आता फेब्रुवारी महिन्यातच चक्क मे महिन्याचा अनुभव येत असून तापमान वाढीने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. घरातून बाहेर पडले की शरीराला उन्हाचे चटके जाणवू लागतात. अचानक वाढलेल्या तापमान नियंत्रणासाठी आपल्या शरीराला खूप बदल करावे लागतात. शरीर उन्हाळ्यासाठी अनुरूप बदल करत असताना अनेक आजारांना बळी पडण्याचा किंवा दुखणी डोके वर काढण्याचा संभव असतो.

- Advertisement -

उन्हाळ्यामध्ये शरीराला द्रव पदार्थांची गरज भासू लागते तसेच शरीराचे तापमान स्थिर राखण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी हृदयाला रक्ताचे अधिक वेगाने पंपिंग करावे लागते आणि या प्रक्रियेमध्ये बिघाड झालेले किंवा नाजूक हृदय असलेल्यांना तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा सामना करत असलेल्या नागरिकांमध्ये उष्माघात, डिहायड्रेशन आणि हृदयविकार होण्याची शक्यता २० टक्क्यांनी वाढते.

याविषयी अधिक माहिती देताना हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी सांगितलं की, डिहायड्रेशन म्हणजेच शरीरामधील पाणी कमी होणे. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करत असेलल्या धमन्या उत्तेजित होऊन हृदयविकार होण्यासाठी कारणीभूत ठरतात. उन्हाळ्यामुळे शरीरातील द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्सची अतिरिक्त हानी होत असल्याने भरपूर पाणी, नारळाचे पाणी, सुप आणि फळांचे रस पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राखणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात कॅफिनयुक्त पेये जास्त घेतल्यास किंवा मद्यपान केल्यास डिहायड्रेशनचा धोका असतो. त्यामुळे हृदयविकार बळावण्याची, आणखी गुंतागुंत वाढण्याची शक्यताही निर्माण होते.

- Advertisement -

शिवाय, अँजिओप्लास्टी होऊन स्टेंटस् बसवलेल्या किंवा हृदयात कृत्रिम झडपा बसवलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण, डिहायड्रेशनमुळे रक्त दाट होऊन स्टेंटमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, असंही डॉ. तारळेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

उष्माघाताबरोबर शरीरामध्ये डिहायड्रेशन असल्यास मळमळ, उलट्या, डोकेदुखी आणि रक्तदाब कमी होणे या समस्या आढळून येतात. परिणामी व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते, तीव्र स्वरूपाचा उष्माघात असल्यास व्यक्ती गोंधळल्यासारखी होते. कधीकधी संतापते, मद्यपान केल्यासारखी स्थिती होते. नाडी जलद लागते, श्वसनाचा वेग वाढतो. रक्तदाब कमी झाल्याने हृदय अधिक वेगाने आकुंचन पावून शरीरास पुरेसा ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न करते. रक्तदाब कमी झाल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे शरीरातील हृदयासोबतच इतर अवयवांचे कार्य थांबते आणि मृत्यू ओढावतो म्हणूनच उष्माघात झालेल्या व्यक्तीला तातडीने सावलीत नेणं गरजेचं आहे. यासोबतच त्या व्यक्तीच्या खांद्यावर, कपाळावर आणि मांड्यावर पाणी ओतावे आणि त्यांना पिण्यास पाणी द्यावे आणि लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे.

बदललेल्या आणि तापलेल्या वातावणाचा त्रास जसा हृदयावर होतो तसाच तो किडनीवर ही होऊ शकतो. दरम्यान, या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी,अंगदुखीने मुंबईकर त्रस्त झाले आहेत.

हिट स्ट्रोकपासून कसा बचाव कराल?
=जास्तीत जास्त पाणी प्यावे
=हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावे
=बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट आणि चपलांचा वापर करावा.
=उन्हात काम करणार्‍या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, ओल्या कपड्यांनी डोके, मान आणि चेहरा झाकावा.
=शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते हे पाहून ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक प्यावे.
=अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, उन्हाचा त्रास होण्याची चिन्हे पाहत तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
=त्यासोबतच बाहेर पडताना काळ्या कपड्यांचा वापर टाळावा. सुती आणि हलके कपडे वापरावे, जास्तीत जास्त पाणी प्यावे. उन्हात काम करणार्‍यांनी संध्याकाळी काम केले पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -