घरमहाराष्ट्रआरपीएफच्या खांद्यावर लागणार बॉडी वॉर्न कॅमेरे

आरपीएफच्या खांद्यावर लागणार बॉडी वॉर्न कॅमेरे

Subscribe

आरपीएफकडून ई-पेट्रोलिंग अ‍ॅप विकसित केले जाणार आहे. या अ‍ॅपमध्ये प्रत्येकाने लॉगिन केल्यानंतर ते ज्या ठिकाणी जातील, ते ठिकाण नियंत्रण कक्षात समजणार आहे.

रेल्वे स्थानके, रेल्वेगाड्यांसह रेल्वेच्या परिसरातील प्रवासी, मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाची असते. त्यामुळे आरपीएफ जवान पेट्रोलिंगवर असतात. आता या पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी आरपीएफच्या खांद्यावर अद्ययावत बॉर्डी वॉर्न कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कॅमेरांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

मध्य रेल्वेवर १ हजार ७०० आरपीएफ जवान तैनात आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ३५१ जवानांचा समावेश आहे. रेल्वेच्या मालमत्ता आणि प्रवासी सुरक्षेसाठी आरपीएफ जवान पेट्रोलिंगवर असतात. जवान निश्चित ठिकाणी आहे किंवा नाही, त्याची दैनंदिन कामे पूर्ण होत आहेत का? याबाबत लगेच माहिती मिळत नाही. त्यादृष्टीने आरपीएफकडून ई-पेट्रोलिंग अ‍ॅप विकसित केले जात आहे. हे अ‍ॅप आरपीएफच्या प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये असेल. या अ‍ॅपमध्ये प्रत्येकाने लॉगिन केल्यानंतर ते ज्या ठिकाणी जातील, ते ठिकाण नियंत्रण कक्षात समजणार आहे. त्यानुसार संबंधितांना आवश्यकतेनुसार अ‍ॅपवरच सूचनाही दिल्या जाणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार आहे. इतकेच नव्हे तर  रेल्वे स्थानक परिसरात सोनसाखळी चोरी, विनयभंग, मानवी तस्करीसारख्या विविध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रेल्वेचा जवानासाठी बॉडी वॉर्न कॅमेरा सिस्टीम अधिक उपयोगी ठरेल. आरपीएफ जवानांच्या नजरेतून सुटणारी गोष्ट या कॅमेरांमधून टिपली जाईल. त्यामुळे गुन्हेगारांना वचक बसेल.

- Advertisement -

या कॅमेरांची क्षमता १० मेगापिक्सल इतकी असून त्यात ३२ जीबीपर्यंत डाटा साठवता येईल. नाईट व्हीजन कॅमेरा असल्याने रात्रीच्या वेळीही या कॅमेरांचा वापर करता येईल. आरपीएफ जवानांच्या खांद्यावर हे कॅमेरे लावल्याने नजीकच्या परिसरासह दूरवरचे छायाचित्रणही टिपण्यास मदत होणार आहे. आरपीएफ जवानांना टेहाळणी करताना या कॅमेरांमुळे प्रवाशांमध्येही सुरक्षेबाबत आत्मविश्‍वास निर्माण होईल. महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हेगारांना जेरबंद केल्यानंतर या कॅमेरांमधील चित्रीकरणाचा वापर न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यास करता येईल, असेही आरपीएफने स्पष्ट केले.

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -