डॉक्टरविना मुरुडचे ग्रामीण रुग्णालय!

रुग्णांची होतेय गैरसोय

Mumbai

येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने शहरासह लगतच्या २२ गावांतून उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. या रुग्णालयात ५ ऑक्टोबर रोजी डॉ. सुमय्या शेख यांचा नियुक्ती कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी पदभार सोडला आहे. तसेच यापूर्वी नियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गंगलवार आणि डॉ. प्रतिमा चतरमल हेही रुग्णालय सोडून गेले आहेत.

गेल्या ३१ मार्च रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण बागूल सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्णवेळ अधीक्षक पद भरले गेलेले नाही. परिणामी बाह्यरुग्ण सेवा विभागात दररोज येणार्‍या किमान १५० ते २०० रुग्णांची संख्या २५ ते ३० वर आली आहे. सध्या वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती न केल्याने गोरगरीब रुग्णांना कोणी वाली उरला नसल्याची स्थिती आहे.

ग्रामीण रुग्णालयात दंत चिकित्सक आहेत. मात्र दंत चिकित्सा करण्यासाठी खुर्ची नाही. नेत्रचिकित्सा तज्ज्ञ पदही रिक्त आहे. रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत निर्णय घेऊन डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. या संदर्भात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. पडोळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सद्यःस्थितीत ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी नाही ही वस्तुस्थिती शुक्रवारी आलिबाग येथे होणार्‍या रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या बैठकीत मांडणार आहे. तसेच नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातही डॉक्टर नाही, ही बाबही निदर्शनसास आणून देणार आहे.
-डॉ. चंद्रकांत जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी