बाटग्यांनी हिंदुत्वाचे सल्ले देणे म्हणजे विनोदच – शिवसेना

मंदिरं उघडण्याच्या श्रेयवादावरून शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

राज्यातील मंदिरे उघडण्यावरुन श्रेयवादा सुरु आहे. यावर आता शिवसेनेने ‘सामना’ या मुखपत्रातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. एका वृत्तवाहिनीचा ‘भुंकरा’ अँकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करतो. त्या ‘भुंकऱ्या’स सोडविण्यासाठी पवित्र न्यायमंदिरांचा ‘बाजार’ करणाऱ्यांना मंदिरे उघडल्याचे श्रेय लाटायचे आहे. अशा लोकांविषयी काय लिहायचे व काय बोलायचे? देवदेवतांनो, त्यांना सुबुद्धी द्या असे म्हणण्याचीही सोय नाही. भाजपातील या उपऱ्या हिंदुत्ववाद्यांचे ढोंग जनताच उघडे पाडेल, अशा घणाघात शिवसेनेने केला आहे.

“भारतीय जनता पक्षाला नक्की काय झाले आहे? महाराष्ट्रातील त्या पक्षाचे डोके सरकले आहे का? असे अनेक प्रश्न मऱहाटी जनतेला पडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी खुले झाले. मात्र हे सर्व श्रेय आमचेच, असा गोंधळ सुरू करून भाजपतील ‘उपऱ्यां’नी विजयोत्सव साजरा केला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या ठिकाणी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वगैरे लावत पोहोचले. भाजपने आंदोलन केले म्हणून देवांचे दरवाजे उघडले वगैरे बतावण्या करणे म्हणजे अकलेचे उरलेसुरले भांडवल दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाण आहे,” असे शिवसेनेने म्हटले आहे.

“ज्यांचा भाजपशी किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेशी काडीमात्र संबंध नव्हता असे बाजारबुणगे सत्तेसाठी भाजपमध्ये घुसले. ते उपरेच देवाच्या दारात श्रेयवादाचा गोंधळ घालीत आहेत. अशाने भाजपची पत वाढणार नसून ती उतारास लागत आहे याचे भान ठेवले नाही तर राज्यात त्यांचे हसे होईल. बाटग्यांनी हिंदुत्वावर बोलावे किंवा सल्ले द्यावेत हा विनोदच म्हणावा लागेल,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे. “कुणीतरी एक बोगस ‘आचार्य’ पुढे करून मंदिरांचे टाळे उघडा यासाठी आंदोलन केले. कोण कुठले हे आचार्य? पण भाजपला फुकटात नाचायला लोक मिळतात. ते भाडय़ाने वापरून महाराष्ट्र सरकारच्या नावाने शिमगा करायचा हा त्यांचा रिकाम्या वेळेतला उद्योग झाला आहे,” असा हल्लाबोल सेनेने केला आहे.

“महाराष्ट्रातील मंदिरे उघडली ती श्रींच्या इच्छेने. याच श्रींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रेरणा दिली. त्याच प्रेरणेतून हे राज्य चालत आहे. भारतीय जनता पक्षाचे मंदिर किंवा धर्मप्रेम कसे फसवे आहे ते पहा. मुंबादेवी, मुंबामाता हे मुंबईचे आराध्य दैवत. याच मुंबामातेवरून ‘मुंबई’ नाव पडले. त्या मुंबईचा अपमान करणाऱया ‘उपऱया’ नटीचा ‘जय जय’ करताना यांचे देवदेवतांचे प्रेम आणि श्रद्धा कोठे अडकल्या होत्या? आता ते ‘छटपूजे’स परवानगी मिळावी म्हणून राजकीय आंदोलन करीत आहेत. छटपूजेस एरवी कधीच परवानगी नाकारली नाही, पण यानिमित्ताने समुद्रकिनारी जो प्रचंड जनसमुदाय जमा होतो तो कोरोना काळात योग्य आहे काय, याचा सारासार विचार करण्याची बुद्धी ते गमावून बसले आहेत. जेथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत तेथे ते अशा प्रकारची आंदोलने करून लोकांना संकटात ढकलत आहेत. हे क्रौर्यच म्हणायला हवे,” असा घणाघात शिवसेनेने केला आहे.