घरमहाराष्ट्रअनेक मुद्द्यांबाबत उत्तर देताना ‘नन्नाचा पाढा’; केंद्र सरकारचं नेमकं चाललंय काय? -...

अनेक मुद्द्यांबाबत उत्तर देताना ‘नन्नाचा पाढा’; केंद्र सरकारचं नेमकं चाललंय काय? – शिवसेना

Subscribe

मागील काही काळापासून अनेक मुद्द्यांबाबत केंद्र सरकारकडून उत्तर देताना ‘नन्नाचा पाढा’

शिवसेनेने पुन्हा एकदा ‘सामना’च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हजारो कोटींचं कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाबाबत नेमकं काय चाललंय याची माहिती नाही, असं उत्तर केंद्र सरकारने न्यायालयात दिलं आहे. यावरुन शिवसेनेने केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारकडे एखादी माहिती मागितली की ‘नो डेटा ऍव्हेलेबल’ असं सांगतात. या सरकारचं नेमकं चाललंय काय? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

“हजारो कोटींचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाबाबत नेमके काय चाललेय याची माहिती नाही, असे उत्तर केंद्र सरकारने न्यायालयात दिले आहे. ‘सर्वशक्तिमान’ सरकारने असे उत्तर देऊन हात वर करावेत हे जरा गमतीचेच वाटते. विजय मल्ल्याचे ब्रिटनमधून प्रत्यार्पण झालेच असे एक वातावरण ज्यांनी निर्माण केले तेच कानावर हात ठेवू लागले तर कसे व्हायचे?” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

“मागील काही काळापासून अनेक मुद्द्यांबाबत केंद्र सरकार उत्तर देताना ‘नन्नाचा पाढा’ वाचत आले आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत सरकारने दिलेले उत्तर याच पाढय़ाची आणखी एक कडी आहे. उत्तर गैरसोयीचे किंवा राजकीयदृष्ट्या अडचणीचे असले तर ‘हाताची घडी तोंडावर बोट’ हे धोरण कामचलाऊ आणि तात्पुरती पळवाट म्हणून ठीक असते. मात्र त्यातून सरकारची ‘घडी’ नीट नाही असे चित्र उभे राहते. कोरोना लॉक डाऊन काळात स्थलांतर करताना मरण पावलेल्या मजुरांची संख्या असो, बेरोजगार झालेल्यांची आकडेवारी असो, नवीन रोजगार निर्मितीचा मुद्दा असो, शेतकरी आत्महत्येचा तपशील असो, प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारने ‘माहिती नाही’, ‘नो डेटा ऍव्हेलेबल’ अशीच उत्तरे अलीकडे अगदी संसदेच्या सभागृहातही दिली आहेत. आता विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबतही सरकार ‘माहिती नाही’ असेच सांगत आहे. म्हणजे विरोधकांनी एखादी माहिती मागितली की सरकार म्हणते, ‘नो डेटा ऍव्हेलेबल.’ न्यायालयाने तपशील मागितला तर सरकारी वकील ‘माहिती नाही’ म्हणून हात वर करतात. सरकार हा नन्नाचा पाढा किती वेळा आणि कशा कशा बाबतीत म्हणणार आहे?” असं सवाल सेनेने केला आहे.

“एखाद्या अभिनेत्याच्या आत्महत्येबाबत, बॉलीवूडच्या ड्रग कनेक्शनबाबत आणि हाथरस बलात्कार प्रकरणामागे असलेल्या कथित षड्यंत्राबाबत खडान्खडा माहिती असल्याचा दावा सरकारी यंत्रणा करते. मात्र देशाचे हजारो कोटी बुडविणाऱ्या मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या कार्यवाहीबाबत ‘माहिती नाही’ असे सांगते. आता ‘या सरकारचं नेमकं काय चाललंय?’ असा प्रश्न जर सामान्य जनतेच्या मनात आला तर त्यावरही सरकारचे उत्तर ‘माहिती नाही’ असेच असणार आहे काय?” असं शिवसेनेने सामनातून म्हटलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -