अश्विनी कुमारांची आत्महत्या रहस्य राहू नये; सीबीआयने तरी पापण्यांची उघडझाप करावी

saamana editorial shivsena on cbi ex chief ashwini kumar

सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांच्या आत्महत्येमागचं कारण शोधणे गरजेचं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर जे अनेक प्रश्न आणि शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात, असं शिवसेनेने सामनामधून म्हटलं आहे. अश्वनी कुमार यांच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्यात कुणालाच रस नाही, असं देखील शिवसेनेने म्हटलं आहे.

“सीबीआयच्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्याने ग्रासते, जगण्यासारखे काही उरले नाही, आयुष्याचाच कंटाळा आलाय म्हणून आत्महत्या करते यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही,” असे शिवसेनेने म्हटले आहे. “आपल्या देशात नक्की काय चालले आहे तेच कळायला मार्ग नाही. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली असे वैद्यकीय पुरावे येऊनही ते मानायला काही लोक तयार नाहीत. हाथरसची तरुणी मरणाच्या दारातून सांगतेय, माझ्यावर बलात्कार झाला. त्यावर सरकार विश्वास ठेवायला तयार नाही. आता सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनीकुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. ते का मेले? हे रहस्य शोधण्यात कोणालाच रस नाही. काळ मोठा कठीण आला आहे हेच खरे!” असंही मुखपत्राच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

“अश्विनीकुमार एक यशस्वी आणि जिंदादिल पोलीस अधिकारी होते. आपल्या सहकाऱयांत ते लोकप्रिय होते. हिमाचलसारख्या छोट्या पहाडी राज्यातून सी.बी.आय.च्या संचालकपदी पोहोचलेले ते बहुधा एकमेव अधिकारी असावेत. सी.बी.आय.चे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक राजकीय गुंता असलेल्या केसेस सोडवल्या. तशी गाजलेली आरुषी तलवार हत्येसारखी प्रकरणेही तपासली. ते एक ‘प्रोफेशनल’ पोलीस अधिकारी होते. निवृत्तीनंतरही ते एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना शिकवत होते व शिमल्यातल्या एका विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करीत होते. ते त्यांचे आवडीचेच काम होते व त्यात त्यांचा वेळ चांगला जात होता. आय.पी.एस. म्हणून त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च पदे त्यांना मिळाली. मग निराश होऊन गळफास लावून घ्यावा असे त्यांच्या जीवनात काय घडले, यावर प्रकाश पडणे गरजेचे आहे. अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येचे रहस्य यासाठी उलगडायला हवे की, वरिष्ठ पदावर काम करणाऱया अधिकाऱ्यांची मानसिक स्थिती काय आहे? त्यांना कोणत्या दबावाखाली काम करावे लागते? त्यांना असे नैराश्येचे झटके का येतात? त्यांची मानसिक अवस्था बिघडलेली असेल तर ते लोक सैन्य किंवा पोलीस दलाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत काय? अश्विनीकुमार हे पोकळ मनाचे गृहस्थ नव्हतेच,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनीकुमार यांनी आत्महत्या केली आहे. देशाचे सामाजिक, राजकीय वातावरण बलात्कार, आत्महत्या अशा प्रश्नी गढूळ झाले असतानाच अश्विनीकुमार यांचा मृतदेह त्यांच्या सिमल्यातील घरी लटकलेल्या अवस्थेत सापडावा हे धक्कादायक आहे. सी.बी.आय.च्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्याने ग्रासते, जगण्यासारखे काही उरले नाही, आयुष्याचाच कंटाळा आलाय म्हणून आत्महत्या करते यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही,” असं शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.