देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हरामखोरीच; शिवसेनेचे भाजपवर आसूड

saamana editorial shivsena criticized devendra fadanvis over Jalayukta Shivar Yojana
शेवटी ‘नाव मोठे लक्षण खोटे’ अशी जलयुक्तची अवस्था; शिवसेनेची टीका

अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. मुंबईचा आणि मुंबई पोलिसांचा अवमान करणाऱ्या कंगनावर राज्यभरातून संतापाची लाट उसळली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाक् यूद्ध रंगलं आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर आणि तालिबानशी केल्यानंतर भाजपने पाहिजे तसा विरोध केला नाही असं संजय राऊत म्हणाले होते. आता शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’मधून भाजपवर कंगना आणि अर्णबवरुन आसूड ओढले आहेत.

शिवसेनेने भाजपचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे. राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची ११ कोटी जनताही माफ करणार नाही, असं म्हणत शिवसेनेने आसूड ओढले आहेत.

“मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू नये. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहेच, पण देशाचे सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्रसुद्धा आहे. याच मुंबईसाठी १०६ मराठी माणसांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती भारताची आहे, पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती भारताची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना ‘पाकव्याप्त’ काश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील ११ कोटी मऱ्हाटी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान म्हणजे देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो, पण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षा कवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले १०६ हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील,” अशा शब्दांत केंद्रावर टीका केली आहे.

“महाराष्ट्र हा सत्यवादी हरिश्चंद्राचा पूजक आहे. मऱ्हाटी जनांशी बेइमानी करणाऱ्या विकृतांशी मराठी माणूस सतत लढत राहिला. कोणीही यावे आणि महाराष्ट्राच्या मऱ्हाटी राजधानीवर टपली मारावी, कोणीही ऐऱ्यागैऱ्याने उठावे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून आव्हानाची भाषा करावी या विरोधात संपूर्ण महाराष्ट्राने एकवटायला हवे. महाराष्ट्र संतापलेलाच आहे, पण भारतीय जनता पक्ष मुंबईचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्यांना सरळ पाठिंबा देत आहे. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि १०६ हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला व असा अवमान करून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर नशेच्या पिचकाऱ्या टाकणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेच्या पालखीचा मान देत आहे. मराठी जनहो, मुंबादेवीचा हा अवमान ज्यांना प्रिय आहे असे लोक दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात बसले आहेत म्हणून मुंबईचा धोका कायम आहे. मुंबईला आधी बदनाम करायचे, नंतर खिळखिळे करायचे. मुंबईस संपूर्ण कंगाल करून एक दिवस ती महाराष्ट्रापासून तोडायची या कारस्थानाची पावले नव्याने पडू लागली आहेत हे आता स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रातील लोकनियुक्त सरकारच्या अधिकारावर आणि स्वातंत्र्यावर हल्ले करण्याची एकही संधी महाराष्ट्रातील भाजपवाले आणि केंद्र सरकार सोडत नाही,” अशी टीका समानाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

“आज शिवसेनेने वेगळी वाट निवडली असली तरी ‘पंतप्रधान’ म्हणून मोदींचा अवमान कदापि सहन करणार नाही. मोदी हे आज एक व्यक्ती नसून पंतप्रधान म्हणून ‘संस्था’ आहे. तेच राज्याराज्यांच्या मुख्यमंत्र्यांबाबत आणि राज्यांच्या प्रांतिक अस्मितेबाबत बोलता येईल. राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची ११ कोटी जनताही माफ करणार नाही! ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील,” अशी टीका शिवसेनेने सामनातून केली आहे.