भाजपने प्रत्येक प्रेसनोटसोबत हाजमोला गोळ्या मोफत वाटाव्यात – सचिन सावंत

आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या संख्येवरून काँग्रेसची खोचक टीका

Mumbai
congress spokesperson sachin sawant

भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी राज्यात केलेलं आंदोलन साफ फसलं असतानाही लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली. शिवाय, आंदोलन यशस्वी झालेलं दाखवण्यासाठी त्यांचा संख्या वाढीचा वेग पाहता १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचं दिसेल. भाजपच्या या हास्यास्पद दाव्याची पोलखोल करत यापुढे प्रेसनोटसोबत भाजपाने हाजमोला गोळ्या किंवा त्यांच्या पसंदीचे एखादे पाचक मोफत वाटावं, अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, आंदोलनासंदर्भात भाजपाने संध्याकाळी ७.०९ वाजता काढलेल्या प्रेसनोटमध्ये राज्यभरातून अडीच लाख कार्यकर्ते सहभागी झाले होते असा दावा केला. त्यानंतर लगेच ८.५६ वाजता काढलेल्या दुसऱ्या प्रेसनोटमध्ये अडीच लाख कुटुंब आणि ८ लाख ७५ हजार ४८७ लोक आंदोलनात सहभागी झाल्याचं म्हटलं आहे. १ तास ४७ मिनिटांत ६ लाख २५ हजार ४८७ ने हा आकडा वाढल्याचे दाखवण्यात आलं. याचा मिनिटाचा हिशोब केला तर एका मिनिटात ५८४५.६७२८९७१ एवढा होत आहे. याच वेगाने भाजपाने गणित केलं तर १५ दिवसानंतर अख्खा महाराष्ट्रच आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा करता आला असता. आंदोलनाकडे लोकांनीच काय पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पाठ फिरवल्याचं सबंध राज्याने पाहिलं. भाजपाचा हा दावा पोकळ आणि हास्यास्पद असल्याचे दिसून येतंय. भाजपला खोटं बोलण्याची सवयच लागलीय, सतत खोटे दावे करणे आणि नंतर तोंडावर आपटणे हे त्यांच्या अंगवळणी पडले आहे.


हेही वाचा – ऑगस्टपूर्वी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु होण्याची शक्यता – हरदीपसिंग पुरी


कोरोनाच्या संकटात सरकारला सहकार्य करुन एकजुटीचे दर्शन घडवण्याऐवजी भाजपने केलेले आंदोलन महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात रुचलेलं नाही. परंतु गर्वाचा फुगा फुटला असतानाही त्यांना वास्तवाचं भान राहिलेलं दिसत नाही. भाजपची एकूण कृती पाहता ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here