‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडेंना जामीन

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना नाशिका जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा जामीन १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर करण्यात आला आहे

Nashik
Sambhaji Bhide
शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना नाशिका जिल्हा सत्र न्यायालयाने आंबा प्रकरणी जामीन मंजूर केला आहे. हा जामीन १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर करण्यात आला आहे. माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने १५० जणांना अपत्यलाभ झाल्याचा दावा संभाजी भिडे यांनी केला होता. त्यामुळे गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेने नोटीस पाठवली होती. परंतु, संभाजी भिडेंनी ही नोटीस स्विकारली नव्हती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या आदेशानुसार महापालिकेने समिती स्थापन करुन सर्व प्रकारची एकतर्फी चौकशी करुन संभाजी भिडे यांना दोषी ठरवत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. यावर आज सुनावणी झाली असून त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा – भिडेंवर सरकारची कृपादृष्टी, ६ गुन्हे घेतले मागे

काय आहे नेमकं प्रकरण?

नाशिक येथे जूनमध्ये झालेल्या सभेत भिडे यांनी माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने १५० जणांना मुले झाली. तसेच ज्यांना पुत्र हवा होता त्यांना पुत्रच झाला, असे वादग्रस्त विधान केले होते. याची दखल घेत समाजसेवक गणेश बोर्‍हाडे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भिडेंविरोधात कारवाई करण्यासाठी नाशिक महापालिका व आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार नाशिक महापालिकेने भिडेंना नोटीस पाठवली होती. परंतु या नोटीशीला भिडेंनी कोणतेच उत्तर न दिल्याने अखेर नाशिक महापालिकेकडून भिडेंविरोधात दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. खटला दाखल केल्यानंतर पहिली सुनावणी १० ऑगस्टला झाली. परंतु त्यावेळी भिडे न्यायालयात हजर राहिले नाही. भिडे गैरहजर राहत असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात येत होती. त्यानुसार ३१ ऑगस्ट, २८ सप्टेंबर आणि १२ ऑक्टोबर अशा पुढील तारखा न्यायालयाकडून देण्यात आल्या. परंतु यातील एकाही तारखेला भिडे व त्यांचे वकीलही न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. भिडे यांना हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आला होता. आज न्यायालयाने भिडे यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

भिडेंच्या वक्तव्यावर टीका

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. राज्यातील बऱ्याच नेत्यांनी त्यांची टीका केली होती. त्याचबरोबर सोशल मीडियावरही भिडे यांच्या वक्तव्यावर टीका केली जात होती.

एकीकडे तंत्रज्ञानाचा विकास होताना आपल्याला दिसतो आणि दुसरीकडे संभाजी भिडेंसारखी माणसे असे वक्तव्य करतात,हे अत्यंत दुर्दैवी आहे. मातृत्व ही अत्यंत खासगी बाब असते. माता होणे याचा प्रत्येक स्त्रीला अभिमान असतो. मलाही तो आहे, मात्र संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळे महिला वर्गाचा अपमानच झाला आहे
– सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा – भिडे गुरूजींची बंगाली जादू ! संततीप्राप्तीसाठी आंबा खाण्याचा सल्ला

संभाजी भिडेंनी वक्तव्य केल्याप्रमाणे त्यांच्याकडील आंबे खाल्ल्याने दीडशे लोकांना अपत्य झाले, हा दावा त्यांनी सिद्ध करावा, असे आव्हान महाराष्ट्र अंनिसकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत तातडीने चौकशी करणे आवश्यक आहे. भिडेंनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा वैचारिक दिवाळखोरी व्यक्त करण्याचा अनुभव संत तुकाराम यांच्या महाराष्ट्राला घ्यावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भिडे महाराष्ट्रातील तरुणाईची डोकी भडकवतात. भावनिक उन्माद निर्माण करतात. तरुणाईच्या शक्तीला हिंसक वळण देतात. भिडेंसारख्या मंडळींचा समाजाची दिशाभूल करण्याचा कुटिल डाव सूज्ञ लोकांनी ओळखावा
– अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here