घरताज्या घडामोडीसंगमनेर : मंगळवारपासून व्यवसाय सुरू होणार, नियम बंधनकारक

संगमनेर : मंगळवारपासून व्यवसाय सुरू होणार, नियम बंधनकारक

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून संगमनेरमधील थांबलेले आर्थिक व्यवहाराचे चक्र मंगळवारपासून काही अंशी सुरू होत आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत येथील व्यवसाय सुरू राहणार असले तरी, गर्दी टाळण्यासाठी प्रांताधिकार्‍यांनी या व्यावसायिकांना नियमावली घालून दिली आहे. नियमावलीचे पालन बंधनकारक राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांची दुकाने बंद केले जाणार आहेत.

गेल्या दोन महिन्यांचा टाळेबंदीनंतर नगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेडझोनमध्ये झाला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील व्यवहार बऱ्याच अंशी सुरू झाले असले तरी प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या संगमनेर मधील बाजारपेठ व अन्य व्यवसाय अद्यापही बंदच आहेत. प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी संपल्यानंतर रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारातील गर्दी टाळण्यासाठी येथील व्यवसाय आणखी काही दिवस बंद ठेवण्याची सूचना मुस्लिम समाजाकडून करण्यात आली होती. तर या सूचनेचा आदर करत येथील व्यावसायिकांनीदेखील रमजान सण होईपर्यंत दुकाने न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी मुस्लिम बांधवांनी रमजान सण घरातूनच साजरा केल्यानंतर मंगळवारपासून येथील व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी व्यावसायिकांना नियोजन करावे लागेल.

दरम्यान संगमनेर-अकोलेचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी व्यावसायिकांसाठी काही निर्बंध घातले आहेत. या निर्बंधाचे व्यावसायिकांना व्यवसाय करतांना पालन करावे लागेल. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळ निर्धारित करण्यात आली आहे. व्यवसाय करताना दोन ग्राहकांमध्ये सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. ज्या दुकानात गर्दी आढळेल आणि सामाजिक नियमांचे पालन होत नसेल ती दुकाने बंद केले जातील. दुकानासमोर दोन ग्राहकांमध्ये अंतर राखण्यासाठी सहा फुटाचे चौकोन आखावे लागतील. दुकानातील व्यक्तीसोबतच ग्राहकांना देखील मास्क वापरणे बंधनकारक असेल.

- Advertisement -

दुकानातील कर्मचाऱ्यांचे शारीरिक तापमान घेण्यासाठी थर्मामीटर आवश्यक असून कर्मचाऱ्यांचे तापमान दररोज मोजणे बंधनकारक आहे. जास्त तापमान आढळणाऱ्या कर्मचाऱ्यास तात्काळ शासकीय आरोग्य केंद्रात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय मोठ्या दुकानदारांनी ऑक्सिजन स्याचूरेशन मोजण्यासाठी आवश्यक सामग्री घ्यावी. व्यवसायाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याची व्यवस्था असावी. आजारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू नये त्यांना तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रावर पाठवावे. व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता आवश्यक असून तेथे कोणीही थुंकणार करणार नाही. खोकताना, शिंकताना रुमाल वापरला जाईल याची काळजी घ्यावी. जास्तीत जास्त ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न करावा. ग्राहकांचा सातत्याने होणारा स्पर्श टाळण्यासाठी अशा ठिकाणी वारंवार निर्जंतुकीकरण केले जावे.

ग्राहक दुकानातील वस्तूंची हाताळणी करणार नाही स्पर्श करणार नाही, यासाठी खबरदारी घेत ग्राहकांना वस्तूची यादी तयार करून आणण्याच्या सूचना द्याव्यात व यादीप्रमाणे माल काढून द्यावा. बिल काउंटरवर अधिक सतर्कतेने काम करण्याची गरज असून जास्तीत जास्त डिजिटल पेमेंटचा वापर करण्याकडे व्यापाऱ्यांचा कटाक्ष असावा. ६५ वर्षावरील दुकानदाराने अथवा ग्राहकाने दुकानात येणे टाळावे, मधुमेह उच्च रक्तदाब श्वसन संस्थेचे विकार हृदय रोग व अन्य दुर्धर आजार असणाऱ्या व्यापारी व कर्मचाऱ्यांनी दुकानात येऊ नये. आदी सूचनांचा यामध्ये समावेश आहे. या नियमांचे व्यावसायिकाकडून पालन न झाल्यास त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -