राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची धास्ती प्रत्येकाच्या मनात अद्याप आहे. कोरोना व्हायरस राज्यात आल्यापासून अनेक वाईट घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यापैकीच एक म्हणजे सांगलीतील मिरज येथील शासकीय कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रूग्णाने आत्महत्या केली. या रुग्णाने चाकूने आपला गळा कापून आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे.
असा घडला प्रकार
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मिरज येथील शासकीय कोविड रूग्णालयात हा प्रकार घडला. हुसेन बाबुमिया मोमीन असे त्या रुग्णाचे नाव आहे. मिरज येथील मालगाव येथे राहणाऱ्या व्यक्तीचे वय ५५ वर्ष असून त्याने आत्महत्या करून स्वतःचा जीव गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहा दिवसापूर्वी कोरोना वरील उपचारासाठी मोमीन यांना मिरज कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी चाकूच्या साह्याने गळा कापून आत्महत्या केली. मिरज रुग्णालयातून याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसून या रुग्णाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.