सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी अमित शहा यांना दिला ‘हा’ सल्ला

Sanjay Raut gave advice to Amit Shah
सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी अमित शहा यांना दिला 'हा' सल्ला

काही महिन्यांपासून सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर अनेक आरोप केले जात होते. पण सुशांतने आत्महत्या केली हे एम्सने जाहीर केल्यानंतर राज्य सरकार आणि मुंबईच्या पोलिसांविरोधातील आरोपांची राळ उडवणारे तोंडावर आपटले. यामुळे राज्यातल्या राजकारणाला नव्या विषयाला तोंड फुटले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी तयार केलेल्या सोशल मीडियावरील फेक अकाऊंटबद्दल गौप्यस्फोट झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सल्ला देताना म्हटले आहे की, ‘राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन आणि विरोध करणाऱ्यांना खच्ची करण्यासाठी या फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो.’

काय म्हणाले संजय राऊत?

‘अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत. सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो हे त्यांनी मान्य केले पाहिजे. राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन आणि विरोध करणाऱ्यांना खच्ची करण्यासाठी या फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो. अमित शहा यांनीच एका कार्यक्रमात सांगितले होते, “आम्ही कोणतीही बातमी आमच्या हजारो ‘Whatsapp’ ग्रुपच्या माध्यमांतून पटवून देऊ शकतो.” हा आत्मविश्वास एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून ठीक आहे, पण आज देशाची सूत्रे आपल्या हाती आहेत हे त्यांना विसरता येणार नाही. ज्या सोशल मीडियाने मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांना निकम्मे ठरवले, त्याच सोशल मीडियावर रिकाम्या बोगद्यात लष्करी गाडीवर उभे राहून आपले पंतप्रधान हात हलवत पुढे निघाले असल्याचा ‘व्हिडिओ’ व्हायरल झाला आणि पंतप्रधानांची प्रचंड खिल्ली उडवली गेली. हे बरोबर नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, सेनाप्रमुख, पोलीस यांना ‘टार्गेट’ करणे म्हणजे देशाच्या भवितव्याचा खड्डा खणण्यासारखे आहे. सुशांतप्रकरणी एकट्या मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी ८० हजार फेक अकाऊंटस् निर्माण केली जातात. म्हणजे अशा प्रकारची किमान पाच कोटी फेक अकाऊंटस् सोशल मीडियावर सक्रिय आहेत. हे बेकायदेशीर काम कायद्यानेच थांबवायला हवे. देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यात पुढाकार घ्यावा. सुरुवात स्वतःच्या पक्षापासून करावी लागेल,’ असा सल्ला संजय राऊत यांनी अमित शहा यांना दिला आहे.


हेही वाचा – ‘अनेक भारतीय दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत’, राहुल गांधींची योगींवर टीका