कॉलरवर स्कॉलर भारी

Mumbai
NCP MP Udayanraje Bhosle
उदयनराजेंचा पराभव

यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर सातारा जिल्हा चर्चेत राहिला. कारण भाजपच्या मेगाभरतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे होणार्‍या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे प्रचंड मतांनी जिंकून येणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, भाजपचा हा दावा साफ चुकीचा ठरला आहे.

कारण कॉलर उडवत स्टाईल दाखवणार्‍या उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि जिल्ह्यात अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणूूूूूूूूून प्रसिद्ध असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी ८७,७१७ मतांनी पराभव केला आहे. राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी दिली होती.शरद पवारांनी देखील सातार्‍यात मोठी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले होते.तर,भर पावसात भिजत शरद पवारांनी घेतलेली सभा पण चर्चेच राहिली होती.

श्रीनिवास पाटील यांच्या विजयाबद्दल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आनंद व्यक्त केला. सातार्‍याच्या गादीची प्रतिष्ठा न राखणार्‍यांचा पराभव झाला आहे. कोणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याचं समर्थन केले जाणार नाही हे लोकांनी दाखवून दिले आहे. सत्ता जाते, सत्ता येते मात्र पाय जमिनीवरच ठेवावे लागतात. सत्तेचा उन्माद जनतेला आवडत नाही हे या निकालातून स्पष्ट झाले आहे,असे पवार म्हणाले. श्रीनिवास पाटील हे एकेकाळचे संसदेचे सदस्य होते. एका राज्याचे राज्यपाल पद त्यांनी सांभाळलं म्हणूनच आम्ही त्यांना उमेदवारी दिली. सातारच्या जनतेने चांगल्या मतांनी त्यांना निवडून दिले त्याबद्दल सातारकरांचा आभारी आहे, असे मत पवारांनी नोंदवले. तर शरद पवारांना दगा दिल्यानेच उदयनराजेंचा पराभव झाल्याचे श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यांत आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजप पक्षात दाखल झालेले उदयनराजे भोसले यांना मोठा फटका बसला आहे. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यानंतर सातार्‍याची जागा मोकळी झाली होती. त्यामुळे या मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान झाले.

पंतप्रधान मोदींचे शक्तिप्रदर्शन फेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मतदारसंघात सभा घेतली. तर शरद पवार यांनी देखील सातार्‍यात प्रचंड मोठे शक्तीप्रदर्शन केले. सातारा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे हा गड राखणे राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. अखेर राष्ट्रवादीला हा गड राखण्यात यश आले.