Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंसह 'या' बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंसह ‘या’ बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

Related Story

- Advertisement -

ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील झेड सिक्युरीटी काढण्यात आली असून आता राज ठाकरे यांना वाय प्लस (y+) सुरक्षा देण्यात येईल. मात्र Adv. उज्ज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुरक्षाविषयक बैठक झाली होती. त्या बैठकीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात येणार सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली. त्यावेळी नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला. या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, राज ठाकरे, नारायण राणे, रावसाहेब दानवे यांच्यासह काही विद्यमान मंत्र्यांच्या समावेश असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढली जाणार आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी दिला होता. यामध्ये फडवीसांच्या जीवाला अनेक बाजूंनी धोका असल्याचे सांगितले होते. तसेच फडणवीसांची सुरक्षा कमी न करण्याची शिफारस केली होती. मुंबई पोलिसांसह गुप्तचर यंत्रणेने हा अहवाल दिला होता, असे माहित असूनही फडणवीसांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तसेच काँग्रेसमधून बाहेर पडलेले पण अजूनही भाजपमध्ये प्रवेश न केलेले कृपाशंकरसिंह यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. शिवाय संजय बनसोडे, अस्लम शेख यांची देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

मी प्रदेशाध्यक्ष असतानासुद्धा सुरक्षा घेतली नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतरच मला सुरक्षा मिळाली होती. काही धमक्यांमुळे मला ही सुरक्षा देण्यात आली होती. सरकारला आता असे वाटत असेल की, धोका कमी झाला आहे. म्हणून त्यांनी सुरक्षा कमी केली असावी. परंतु त्याची एक पद्धत असते. ठाकरे सरकार राजकीय निर्णय घेत आहे. परंतु माझी याबाबत कोणतीही तक्रार नाही.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा.

 

आम्ही एक वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती बनविली. त्या समितीकडून कोणाला जास्त धोका आहे? याचा अहवाल द्यायला सांगितले. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार कोणत्या नेत्याला कोणत्या प्रकारची सुरक्षा द्यायला पाहिजे, ते त्यांनी सांगितले. त्यानुसार आता सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात कोणाचा कोणता पक्ष आहे? हे बघितलं गेलं नाही. – अनिल देशमुख, गृहमंत्री.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यांची झेड सिक्युरिटी काढली. मात्र, सुरक्षा काढली जरी असली तरी त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. ठाकरे सरकार हे जाणीवपूर्वक राजकारण करत आहे. राज ठाकरे यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. राज ठाकरे यांना मनसे सैनिक सुरक्षा पुरवतील. – राजू पाटील, आमदार, मनसे.

 

आम्हाला आमच्या सुरक्षेची चिंता नाही. मात्र, सरकारने जनतेच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. सरकारने एवढे केले तरी आमच्यासाठी पुरे आहे. – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद.

 

अतिरेक्यांपासून माझ्या जिवाला धोका असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली होती. पण राज्य सरकताने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज सरकार जबाबदार असेल. – नारायण राणे, खासदार, भाजप

 

- Advertisement -

 

 


हेही वाचा – रतन टाटांचं उदाहरण देऊन संजय राऊतांची मोदींवर टीका


- Advertisement -