तिघांचा फास पाहून चौथ्या मित्राने घाबरुन काढला पळ

शहापूर सामुहिक आत्महत्या प्रकरण, दररोज नवनवीन धक्कादायक बाबी उजेडात

Hanging
प्रातिनिधिक फोटो

शहापूर तालुक्यातील घडलेल्या तिहेरी आत्महत्येच्या तपासात दररोज नवीन धक्कादायक बाब समोर येत आहे. मोक्ष प्राप्तीसाठी आणि अमरतत्व मिळण्यासाठी तीन जीवलग मित्रांनी केलेल्या आत्महत्येत त्यांचा आणखी एक चौथा मित्र सामील होता, मात्र त्याने या तिघांना लटकताना बघून घाबरून तेथून पळ काढला असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. पोलिसांनी या चौथ्या मित्राला शोधून काढले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र शहापूर पोलिसांकडून याबाबत अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

शहापूर तालुक्यातील चांदा गावात राहणारे नितीन बेहरे, मुकेश घावटे आणि महेंद्र दुबले या तीन जीवलग मित्रांनी १४ नोव्हेंबर रोजी रात्री गावाच्या बाहेर असणार्‍या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती.तब्बल ६ दिवसांनी या तिघांचे मृतदेह एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत शहापूर पोलिसांना मिळून आले होते. हे तीनही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते, पोलिसांना घटनास्थळी काही आक्षेपार्ह वस्तू मिळून आलेल्या होत्या, तसेच तिघांपैकी एकाच्या घरातून तांत्रिक विद्याची पुस्तके जप्त करण्यात आली होती. नितीन बेहरे हा तांत्रिक विद्याच्या आहारी गेला होता, व मोक्ष मिळवून अमरतत्व प्राप्त करण्यासाठी या तिघांनी सामूहिक आत्महत्या केली असल्याची चर्चा शहापूर तालुक्यात प्रचंड प्रमाणात सुरू होती.

शहापूर पोलिसांना घटनास्थळी मिळून आलेल्या साडीने गळफास लावून तिघांनी आत्महत्या केली होती, मात्र त्या ठिकाणी साडीचे चौथे टोक रिकामे होते,त्या टोकाला देखील फास तयार करण्यात आला होता,म्हणजे या सामूहिक आत्महत्येत चौथा व्यक्ती देखील सामील होता असे घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यावरून स्पष्ट झाले आणि पोलिसांनी ब्या चौथ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्या व्यक्तीची माहिती मिळवली असून त्याच्याकडे याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. याबाबत मात्र शहापुर पोलीसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.