सेना-भाजपची युती विरोधकांच्या हिताची

निवडणुकीत शिवसेना-भाजप एकाच पारड्यात , सत्ताधारी म्हणून सेनेवरही होणार विरोधकांचा हल्लाबोल

Mumbai
सेना-भाजप

राज्यात शिवसेना ही भाजपसोबत सत्तेत असतानाही शिवसेनेने प्रत्यक्षात सरकारी धोरणांवर टिका करून विरोधकांची जागा व्यापली होती. त्यामुळे मागील पावणे पाच वर्षांच्या सत्ताकाळात शिवसेनेच्या या धोरणामुळे जनसामान्यांमध्ये दोन्ही काँग्रेस विरोधक म्हणून प्रभावी ठरले नाहीत. मात्र लोकसभा निवडणूक तोंडावर येताच शिवसेना आणि भाजप यांच्यात समेट होऊन युतीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात सत्ताधारी म्हणून भाजपसोबत आता शिवसेनेलाही विरोधकांच्या आरोपांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सेना-भाजपला एकाच पारड्यात बसवून दोघांच्याविरोधात राज्यभर रान पेटवतील. अशा प्रकारे ही युती विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे युती झाल्यामुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊन त्याचा काही हिस्सा शिवसेनेच्या वाट्याला गेला असता, पण आता युती झाल्यामुळे सरकारविरोधातील मतांचे विभाजन टळणार असून ती सर्वच्या सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवण्यासाठी विरोधकांना शक्य होणार आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असतांनाही शिवसेनेने नेहमी सरकारविरोधी सूर लावला. सेनेच्या मुखपत्र ‘सामना’मधून टिका करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खालच्या थराला जावून टिका करण्यात आली. शिवसेनेच्या आक्रमक विरोधी भूमिकेमुळे दोन्ही काँग्रेसची कोंडी होत गेली. असे वातावरण या चार वर्षात अनुभवायला मिळाले. आता आता युती झाल्याने शिवसेना-भाजपने पु्न्हा हातात हात घेतला असून शिवसेना यापुढे सत्ताधारी पक्षासारखे वागणार यात शंका नाही.

शिवसेना-भाजपाची युती झाल्याने आता राज्यात शिवसेना भाजपाविरोधात किंवा सरकारविरोधात एक चकार शब्द काढणार नाही. त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षांची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला व्यापता येणार आहे. युती झाली नसती तर भाजपाविरोधातील मते शिवसेनेला मिळाली असती, तिच मते आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळतील, अशी आशा या दोन्ही पक्षांना आहे. शिवसेनेला मत म्हणजे मोदींना मत हे आता स्पष्ट झाल्याने विरोधी पक्षांना राज्यात विरोधी पक्षाच्या जागा मोकळी झाली आहे

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यातील विधानसभेच्या निकालाने देशातील वातावरण बदलत असल्याची जाणीव भाजपाला झाली. त्यामुळे एनडीएमधील मित्र पक्ष टिकवण्यासाठी भाजपाची धावपळ सुरू झाली. बिहारमध्ये २२ खासदार असूनही भाजप १७ जागा लढवत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत ठेवण्यासाठी शिवसेनेने केलेली जहरी टीका विसरून भाजपचे नेते मातोश्रीच्या पायर्‍या चढणार आहेत. त्याचे फलित म्हणजे शिवसेनेने स्वबळाच्या घोषणेवरून घुमजाव करून युतीची मोट बांधली आहे. मात्र, गेल्या चार वर्षात भाजप आणि शिवसेना समर्थकांमध्ये टोकाचे वाद निर्माण झाले आहेत. युती झाली तरी दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी एकत्र येऊन काम करणं आणि एकमेकांची मते मिळवणे हे आव्हान दोन्ही पक्षांसमोर आहे.

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही भाजपचे निवडणूक प्रचार दौरे थांबलेले नाहीत. भाजप या हल्ल्याचा राजकीय फायदा उठवण्याचे काम करत असून शहिदांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम भाजप करत आहे. १४ फेब्रुवारीला मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांसोबत जागावाटपाची चर्चा म्हणजे तुम्ही कुठले लोणी खात होता याचे जनतेला उत्तर द्या. शिवाय कालपर्यंत उध्दव ठाकरे चौकीदार चोर आहे असे सांगत होते आणि आज युती करण्याची भूमिका घेत आहात मग तुम्ही चोरावर मोर आहात का.
– नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here