ज्येष्ठ वस्तुसंग्रहालयतज्ज्ञ पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचं निधन

ज्येष्ठ वस्तुसंग्रहालयतज्ज्ञ पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचं वाशिंद येथे राहत्या घरी निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Thane
ज्येष्ठ वस्तुसंग्रहालयतज्ज्ञ सदाशिव गोरक्षकर

संग्रहालयांनाच स्वायत्तता मिळवून देणे ही मागणी सातत्याने करणारे तसेच संग्रहालये ही प्रेक्षकांपर्यंत नेऊन पोहोचवणारे ज्येष्ठ वस्तुसंग्रहालयतज्ज्ञ पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचं वृद्धापकाळनं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वाशिंद येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे इतिहासाचा जाणकार गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

गोरक्षकर यांनी १९७४ ते १९९६ या काळात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे संचालक पद सांभाळले होते. कोकणातील देवरूख येथील लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय हे गोरक्षकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारले गेले होते. त्यांनी संग्रहालयातील डॉक्टरेटदेखील मिळवली होती. संग्रहालयातील मौलिक वस्तूंच्या आधारे त्यांनी ‘अॅनिमल इन इंडियन आर्ट’, ‘हिस्ट्री ऑफ मेरिटाईम इंडिया’ अशा प्रदर्शनांची रचना केली होती. या सर्व कार्यकर्तृत्वाची दखल सरकारने देखील घेतली आणि त्यांना २००३ मध्ये ‘पद्मश्री’ हा नागरी पुरस्कार देण्यात आला. तसेच २०१६ मध्ये ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा देखील जीवगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.