Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सिरमची लस सहा राज्यांकडे रवाना

सिरमची लस सहा राज्यांकडे रवाना

Related Story

- Advertisement -

ज्या कोरोनाविरोधी लसीची संपूर्ण देश वाट पाहत होता ती कोरोनाविरोधी लस अखेर आली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून कोविड-19 लसीची पहिली खेप रवाना करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटमधून कोरोनाविरोधी ‘कोव्हिशिल्ड’ लस देशातील विविध राज्यांसाठी पुणे एअरपोर्टकडे रवाना करण्यात आली. पण, ही लस कोणत्या राज्यांकडे रवाना करण्यात आली याबाबत सिरम इन्स्टिट्यूटकडून माहिती मिळू शकलेली नसली तरी सहा राज्यांमध्ये ही लस जाणार आहे.

16 जानेवारीपासून देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

- Advertisement -

पुण्याच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून लसीची पहिली खेप रवाना करण्यात आली. लस देशभरात वितरीत केली जाणार आहे. लस कोणत्या राज्यांना पाठवण्यात आली याबाबत सिरमकडूनच माहिती मिळू शकेल. पोलिसांनी लस घेऊन जाणार्‍या ट्रकना एअरपोर्टपर्यंत सुरक्षा देण्याचे काम केले.

भारतात पहिल्या टप्प्यात कोविड वॉरिअर्सना लस दिली जाणार आहे. देशभरातील कोरोनाविरोधी लढ्यातील आरोग्य कर्मचार्‍यांना 16 जानेवारीपासून लस देण्याची मोहीम सुरू केली जाईल. मंगळवारी सकाळपासूनच सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीचे बॉक्स ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, लस घेऊन जाणार्‍या ट्रकना आतून सॅनिटाईज करण्यात आले आहे.

- Advertisement -

लसीकरण मोहीम योग्य पार पाडली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. सामान्यांना एवढ्यात कोरोनाविरोधी लस मिळणार नाही. आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. त्यात 30 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -