घरमहाराष्ट्रजिद्दी दाम्पत्याच्या आमराईला पाण्याची तहान!

जिद्दी दाम्पत्याच्या आमराईला पाण्याची तहान!

Subscribe

जिद्द आणि चिकाटी, सोबत अपार कष्ट करण्याची तयारी असेल तर त्याचे गोड फळ मिळते या निसर्ग नियमाची प्रचिती तालुक्यातील खडकवणे दत्तवाडीमधील दाम्पत्याने तयार केलेली आमराई पाहिल्यानंतर येते. मात्र उन्हाळ्यात पाण्याचा तीव्र दुष्काळ असणार्‍या परिसरातील या आमराईला पाण्याची तहान भागविणे अवघड जात असल्याने त्या ठिकाणी शासनाने विंधण विहिरीची सुविधा उपलब्ध करून या दाम्पत्याच्या जिद्दीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

कलावती कदम आणि एकनाथ कदम या शेतकरी कुटुंबाने आपल्या २५ गुंठे वरकस जमिनीवर १०० कलमी आंब्याची बाग तयार करण्याचे धाडस केले आहे. या परिसरात एकमेव भाताचे पीक घेतले जाते. कदम कुटुंबाकडे थोडी शेती असून, त्यात बारा महिने अपार कष्टाने भाताचे पीक घेत असतात. मात्र गेल्या 4-5 वर्षांपासून वेळीअवेळी पडणार्‍या पावसामुळे मोठे नुकसान त्यांना सहन करावे लागत आहे. मात्र खचून न जाता त्यांनी तालुका कृषी विभागामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळ लागवड योजनेचा लाभ घेतला. या योजनेंतर्गत त्यांना १०० कलमी आंब्याची झाडे विनामूल्य मिळाली.

- Advertisement -

कृषी सहाय्यक दत्ताराम नरुटे यांच्या मार्गदर्शनामुसार त्यांनी ही कलमे आपल्या २५ गुंठे वरकस जमिनीत तीन बाय तीन फुटांचा खड्डा खोदून आणि पाच बाय पाच फुटांच्या अंतरावर लावली. या संदर्भात बोलताना कलावती कदम म्हणाल्या, मुळातच शेतीमधून भाताचे तुटपुंजे उत्पन्न मिळत असे तेही चार वर्षांपासून अवकाळी पावसामुळे मिळत नाही म्हणून आम्ही कलमी आंब्याची लागवड करून परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरवर्षीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी भातशेती सोडून शहराची वाट धरली आहे. गावात कित्येक घरे बंद आहेत. अशा परिस्थितीत काही शेतकरी कसातरी तग धरून आहे. त्यामुळे कदम यांच्यासारख्या मातीशी नातं जुळलेल्या हाडाच्या शेतकरी कुटुंबाला शासनाने मदतीचा हात दिला तर आपोआप इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि स्थलांतरही रोखता येणे शक्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -