घरमहाराष्ट्रशरद पवार भाजपचे लक्ष्य

शरद पवार भाजपचे लक्ष्य

Subscribe

राज्य विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांतील अनेकांना पक्षात घेणार्‍या भाजपला आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचीच भीती वाटते आहे. राजकारणात होत्याचे नव्हते करण्यात माहीर असलेल्या पवारांमुळे नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेऊन त्या पक्षाने पवारांना टार्गेट करण्याचे ठरवले आहे. सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पवारांवर घणाघात करत त्यांना लक्ष्य करण्याची पध्दतशीर आखणी भाजपने सुरू केली आहे.

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य नेत्यांनी ऐनवेळी भाजपत प्रवेश केल्याने या दोन्ही पक्षांची ताकद कमी झाली आहे. यामुळे निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्ने भाजप नेत्यांना पडले होते. विशेषत: सातारचे राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपत प्रवेश घेतल्यानंतर भाजप नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र या महत्वाच्या दोन नेत्यांच्या मतदारसंघांत म्हणजे सातारा आणि सोलापूर माळसिरस या क्षेत्रात जाहीर मेळावे आयोजित करत पवार यांनी ‘आपण संपलो नाही’, हे दाखवून दिले.

- Advertisement -

या दोन्ही जाहीर मेळाव्यांवेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दोन्ही मेळाव्यांद्वारे पवारांनी भाजपला एकार्थी आव्हानच उभे केल्याचे बोलले जाते. आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारार्थ पवार यांच्या राज्यातील दौर्‍याचा पहिला कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या त्यांच्या जाहीर सभांना लोकांचीही गर्दी होते आहे. या सभांमधून ते सेनेपेक्षा भाजपवरच प्रखर टीका करत असल्याचे पाहायला मिळते. स्थानिकांचा पवार यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता भाजपने पवारांनाच टार्गेट करण्याचे ठरवले आहे.

राज्यात पवारांच्या ज्या ठिकाणी सभा होतील तिथे लागलीच सभा आयोजित करत त्यांना उत्तरे देण्याची तयारी पक्ष करत असल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. इतकेच नाही तर पवारांच्या सभेनंतर त्याच परिसरात पक्षाच्या प्रवक्त्याने जाऊन पत्रकार परिषदेद्वारे पवारांनी केलेले आरोप खोडून टाकण्याचे ठरवले आहे. यासाठी प्रदेशच्या सर्वच प्रवक्त्यांना कामाला लावले जात आहे.

- Advertisement -

सुरुवात कोल्हापूरपासून
पवारांना टार्गेट करण्याची सुरुवात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून केली. पवारांना आम्ही राजकारणातूनच नव्हे तर समाजकारणातूनही संपवणार आहोत अशा शब्दात पवारांवर टीका केली.

कोल्हापूर येथील एका जाहीर सभेत चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर हल्ला चढवला. मला कोथरूडमध्ये अडकून ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करणार्‍या दोन्ही काँग्रेसवाल्यांना साधा उमेदवार मिळाला नाही. त्यावरून या पक्षांची ताकद कळते. मी या मतदारसंघातून निवडून येणारच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पवार ही एकच शक्ती आघाडीसाठी झटत असल्याने पवारांना रोखण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांच्या भाषणातून अधोरेखित झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -