घरताज्या घडामोडीशरद पवार, उद्धव ठाकरेंनी मोदींविरोधात राष्ट्रीय आघाडीसाठी प्रयत्न करावेत - संजय राऊत

शरद पवार, उद्धव ठाकरेंनी मोदींविरोधात राष्ट्रीय आघाडीसाठी प्रयत्न करावेत – संजय राऊत

Subscribe

“मोदींच्या तोडीचा नेता आज विरोधी पक्षात नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी राज्या राज्यातील नेत्यांची आघाडी निर्माण करावी. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांना एकत्र करुन पर्याय उभा केल्यास जनतेमध्ये आशा निर्माण होऊ शकतो. जनता दलाच्यावेळी हा प्रयोग झाला होता. भाजप हा देशातील सर्वात शक्तीशाली पक्ष झालेला आहे. त्यांना वाटेल तसं ते करु शकतात. त्यामुळेच छोटे पक्ष त्यांच्यासमोर उभे राहू शकत नाहीत. राहुल गांधीच्या प्रतिमाभंजनाचा प्रयोग भाजपने केला. उद्धव ठाकरेंच्याही प्रतिमाभंजनाचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही.”, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपलं महानगर आणि माय महानगरच्या खुल्लमखुल्ला मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु, असे आश्वासन बाळासाहेबांना दिले होते. त्या प्रक्रियेचा मला भाग होता आले, याचा आनंद होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार हा प्रस्ताव शरद पवार यांचाच होता. तसेच उद्धव ठाकरेंना तयार करण्यासाठी देखील पवार यांनी पुढाकार घेतला असल्याचे राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

“विधानसभा निवडणुकीचा निकाल ते २८ नोव्हेंबर पर्यंतचा शपथविधी या ३६ दिवसांत खूप ताण आला होता. त्या ३६ दिवसांच्या घडामोडींवर चार पुस्तके आतापर्यंत आलेली आहेत. मी त्या ३६ दिवसांवर पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला तर आधी लिहिलेल्या चारही पुस्तकातील काही पाने फाडावे लागतील. आम्ही जेव्हा महाविकास आघाडी सरकारची बोलणी करत होतो, तेव्हा तिथे ऐकायला कुणीही नव्हतं. एका पुस्तकात लिहिलंय की, मी गुप्तपणे मुंबई-पुणे महामार्गावर शरद पवारांना भेटलो होतो. हे धांदात खोटे आहे. शरद पवारांना मी कधीही लपून छपून भेटलेलो नाही. अगदी निकालाच्या दिवशी देखील मी दुपारीच शरद पवारांना घरी जाऊन भेटलो होतो.”, असा खुलासा राऊत यांनी केला. सरकार स्थापनेच्या काळात माध्यमात आलेल्या बातम्यांवर बोलताना ते म्हणाले की, “जेव्हा फक्त वृत्तपत्र होती, तेव्हा त्यातील ९० टक्के गोष्टी खऱ्या होत्या. पण इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यापासून आम्हीच जलद कसे, तुमच्यापेक्षा आमची फोडणी जास्त कशी? यावरच जास्त खल होतो.”

सरकारच्या पहिल्या वर्षातील आठ महिने कोरोनामध्ये गेले आहेत. कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जे काम करायचे होते, ते सर्वकाही करता आलेले नाही. एवढेच काय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील राज्यकर्त्यांनाही त्यांची कामे करता आलेली नाहीत. पण पुढच्या चार वर्षात सरकार निश्चितच खूप काही काम करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

 

ईडीची कारवाई आणि केंद्र सरकारच्या संबंधाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “मला ईडीची नोटीस आली याचा माध्यमातील लोकांनी; बाऊ केलाय. मला ईडीची भीती वाटत नाही. तणाव येण्यासारखे त्या नोटीशीत काहीच नाही. ज्याचे सरकार असते, त्याचे ईडीवाले गुलाम असतात. केंद्र आणि राज्याच्या अखत्यारीतील संस्था आता सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कधीच संपले आहे, असा घणाघाती आरोप राऊत यांनी केला आहे. “नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर देखील युपीए सरकारकडून सीबीआय, एटीएस अशा संस्थांनी चौकशीच्या नोटीसा पाठविल्या होत्या. या कारवाया राजकीय हेतूने असतात, असे माझे ठाम मत आहे. आम्ही आमच्या आयुष्यात कधीही चुकीची गोष्ट केली नाही आणि करणारही नाही. हे आमच्याविरोधात षडयंत्र करणाऱ्यांनाही माहीत आहे. मात्र हुल उडवून देण्याचे काम विरोधक करत आहे, असाही आरोप त्यांनी केला.

कंगना राणावत प्रकरणाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “कंगना राणावतशी माझे काही वैयक्तिक वाद नाहीत. ती मोठी अभिनेत्री असू शकते मात्र तिने मुंबई, महाराष्ट्राचा अवमान करु नये. या देशात प्रतिष्ठा काय फक्त न्यायालयांना आहे का? व्यक्ती, संस्था, देश आणि राज्याला देखील प्रतिष्ठा असते आणि त्या प्रतिष्ठेला कुणी कसा काय धक्का लावू शकतं? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद ही एक संस्था आहे. त्याच्यावर जर हल्ला झाला तर त्याच्याशी मुकाबला करणे माझे कर्तव्य आहे. खरंतर त्यावेळी सगळ्या कॅबिनेटने रस्त्यावर उतरायला हवे होते. सरकार म्हणून सर्वांनी प्रतिकार केला पाहीजे होते. त्यातही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला. बाहेरचे लोक येऊन आमच्या नेत्यांबद्दल बोलायला लागले तर मला चीड येणारच. चीड येणारी आमची ही शेवटची पिढी असल्याचे मला वाटते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -