घरमहाराष्ट्रखटले असलेले कावळे गेले, स्वच्छ मावळे उरले - शरद पवार

खटले असलेले कावळे गेले, स्वच्छ मावळे उरले – शरद पवार

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. पक्षातून होणाऱ्या या आऊटगोईंगमुळे कार्यकर्ता खचू नये, यासाठी आता शरद पवार यांनीच पुढाकार घेतला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात महिला संघटनेच्या बैठकीत पवारांनी पक्ष सोडणाऱ्यांवर चांगलीच टीका केली. अनेक लोक पक्ष सोडत आहेत. मात्र जे खटल्यात आहेत, त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे. त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. “कावळ्यांची चिंता करायची नाही, तर मावळ्यांची चिंता करावी” अशी भूमिकेचे ट्विटच शरद पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

भाजपकडून पक्षप्रवेशाची आणखी मेगाभरती होणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आणखी किती आमदार जाणार? याबाबत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. अशात कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह भरण्यासाठी शरद पवारांनी पक्ष सोडणाऱ्यांना कावळ्याची उपमा देऊन, पक्षात राहणाऱ्यांना मावळे म्हटले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत तेथील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले होते, त्यानंतर पहिल्यांदा अजित पवार यांनी “गेले ते कावळे, राहिले ते मावळे” असा डायलॉग मारला होता. त्याची पुर्नरावृत्ती आज शरद पवार यांनी केली.

महिलांसाठी राष्ट्रवादीकडून हेल्पलाईन सुरु

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दिवसागणिक महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना घडत असून त्यांच्या मदतीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभागाच्या वतीने निर्भया सखी हे पथक तसेच टोल फ्री क्रमांकाची हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा अध्यक्षांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. महिलांची सुरक्षितता, आगामी निवडणूका आदी विषयांवर त्यांनी जिल्हाध्यक्षांना मार्गर्शन केले.

- Advertisement -

विद्यार्थींनीसाठी स्वच्छंदी भरारी अभियानदेखील सुरु करण्यात येत असून त्या अंतर्गत प्रत्येकीला स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. निर्भया सखी हे पथक प्रत्येक जिल्ह्यात सुरु करण्यात येणार असून त्यातून महिलांमध्ये स्वसंरक्षणाची भावना तसेच आत्मविश्वास निर्माण करण्याचा कार्य केले जाईल. त्याशिवाय विविध शासकीय योजनांचा हक्क मिळवून घेण्याबाबतही मार्गदर्शन केले जाईल, असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -