घरमहाराष्ट्रउमेदवारीच्या वादामुळेच माढ्यातून शरद पवार निवडणूक लढवणार?

उमेदवारीच्या वादामुळेच माढ्यातून शरद पवार निवडणूक लढवणार?

Subscribe

शरद पवार लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुद्द शरद पवारांनीच तसे संकेत दिल्यामुळे आता पुन्हा एकदा निवडणूक प्रचारात शरद पवारांच्या भाषणांचा झंझावात पाहायला मिळू शकतो.

२०१४च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान ‘यापुढे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत शरद पवारांच्या माढा लोकसभा मतदार संघातून त्यांच्या जाही विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तत्कालीन मोदी लाटेला न जुमानता मोहिते पाटील माढ्यातून मताधिक्याने निवडून देखील आले होते. पण २०१९च्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांच्याऐवजी खुद्द शरद पवारच लोकसभेच्या रणधुमाळीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खुद्द शरद पवारांनीच तसे संकेत दिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास काय रणनीती असावी? याविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बारामतीमध्ये खास बैठक झाली. या बैठकीला शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आणि विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. या बैठकीमध्येच मोहिते पाटील यांना उमेदवारीसाठी सध्या ‘होल्ड’वर राहायला सांगण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

काय म्हणाले शरद पवार?

माढा लोकसभा मतदारसंघातून मी स्वत: निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील आणि जवळपास सर्वच वरीष्ठ सहकाऱ्यांनी केली आहे. निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. पण सहकाऱ्यांच्या या विनंतीचा आपण विचार करू.

स्वत:चाच निर्णय शरद पवार बदलणार का?

२००९च्या निवडणुका जिंकल्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं शरद पवारांनी जाहीर केलं होतं. मात्र, या बैठकीनंतर त्यांनी केलेल्या ‘विचार करू’ या संकेतांमुळे ते त्यांचाच निर्णय बदलणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक माढ्यामध्ये विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रभावशाली नेते प्रभाकर देशमुख यांच्यामध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू आहे. माढ्यामधून उमेदवारी मिळावी, यासाठी हे दोन्ही नेते प्रयत्न करत आहेत. पण या चढाओढीमध्ये दोघेही मागे हटत नसल्यामुळेच शरद पवारांनी स्वत:च तिथून लढण्याची तयारी दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

विजयसिंह मोहिते पाटील नाराज?

दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार नसल्याचं ऐकून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान खासदार असल्यामुळे उमेदवारी विजयसिंह मोहिते पाटलांनाच मिळणार, असं बोललं जात होतं. मात्र, आजच्या बैठकीमध्ये माढ्याच्या उमेदवारीविषयी कोणताही निर्णय न झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार?

भाजपला पराभूत करण्याचा निश्चय करत एकत्र आलेल्या तिसऱ्या आघाडीतल्या पक्षांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मोदींच्या समोर त्यांच्याच तोडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून कुणाला उभं करायचं? राहुल गांधींच्या नावावर सदस्य पक्षांमध्ये काही प्रमाणात मतभेद असताना शरद पवारांच्या रुपाने एक सक्षम पर्याय त्यांच्यासमोर उभा करता येऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवार जर निवडून आले आणि पक्षीय गणितांच्या जोरावर महाआघाडीने त्यांना पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून घोषित केले, तर महाआघाडीला मोदींना कडवी टक्कर देता येईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -