कंगना राणावत प्रकरणी शरद पवारांच्या सरकारला कानपिचक्या

sharad pawar reaction on BMC demolition work
शरद पवार यांची कंगना राणावत प्रकरणावर प्रतिक्रिया

मुंबई महापालिकेच्यावतीने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर हातोडा चालविण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. कंगना प्रकरणावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून तिच्या वक्तव्यांना फार महत्त्व द्यायला नको होते, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच या कारवाईमुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, कंगना राणावतचे कार्यालय हे अधिकृत की अनधिकृत हे मला माहिती नाही. मुंबईत बेकायदेशीर बांधकामे नवी नाहीत. मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे कायदे, नियमावली आहे. त्यानुसार पालिका काम करते. मात्र सध्याच्या परिस्थितीत केलेल्या कारवाईमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांना पोलिसांचा अनुभव आहे. त्यामुळे कुणी त्यांची तुलना पाकिस्तानशी केली काय किंवा इतर कुणाशी केली काय? त्याकडे फारसे गांभीर्याने घेऊ नये. उलट असे वक्तव्य करणाऱ्यांना आपण अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. लोकही या गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान शरद पवारांना आलेल्या धमक्यांबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार यांनी पत्रकार परिषदेत कॉल रेकॉर्ड्स असलेला कागद दाखविला. मला आतापर्यंत सात फोन आले असून त्याद्वारे धमकी दिली गेली. यापुर्वीही अनेकदा मला धमक्यांचे फोन आलेले आहेत. मात्र अशा धमक्यांना मी गांभीर्याने घेत नाही, असे उत्तर शरद पवार यांनी दिले.

दरम्यान कंगनाच्या घरावर हातोडा चालविल्यामुळे कंगनाने पुन्हा एका शिवसेनेला आव्हान दिले आहे. मागच्यावेळी तिने मुंबईला पीओके म्हटले होते. मात्र यावेळी तिने थेट पाकिस्तान म्हणून संबोधले आहे. तसेच शिवसेनेला बाबर सेना असे हिणवले आहे. लोकशाहीची हत्या झाल्याचे सांगत कंगना शिवसेनेवर ट्विटरच्या माध्यमातून हल्ला चढविला होता. त्यानंतर कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन मुंबई महानगरपालिकेची कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली.