जाहीर केलेली मदत पुरेशी नाही, नुकसान खूप मोठं आहे – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केल्यानंतर या भागातल्या मदतकार्याबद्दल काही महत्त्वाच्या सूचना राज्य सरकारला केल्या आहेत.

Kolhapur

कोल्हापूर, सांगली या भागामध्ये गेल्या २ आठवड्यांपासून पावसाने आणि त्यानंतर आलेल्या पुराने घातलेलं थैमान आत्ता कुठे कमी होऊ लागलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता या जिल्ह्यांमध्ये मदतकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू झालं आहे. याच पूरग्रस्त भागाचा दौरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर कोल्हापूरमध्येच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये सरकारने कोणत्या मार्गाने मदतकार्य करायला हवं, त्यासंदर्भात त्यांनी काही सूचना केल्या. यावेळी, ‘सध्या जाहीर केलेली ६ हजार ८१३ कोटींची मदत पुरेशी वाटत नसून नुकसान खूप मोठं आहे, मोठ्या मदतीची आवश्यकता पडू शकते’, असं शरद पवार यावेळी म्हणाले. तसंच, आता मोठ्या प्रमाणात मदत या जिल्ह्यांमध्ये जात असून या मदतीचं व्यवस्थित नियोजन होणं गरजेचं असल्याचं देखील त्यां नी या पत्रकार परिषदेत नमूद केलं.

‘अलमट्टीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज’

दरम्यान, ‘कर्नाटक सरकारने वेळीच पाणी सोडलं असतं, तर कोल्हापूरमध्ये पूर आलाच नसता. अलमट्टीच्या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. पूर आला तेव्हा राज्य सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्यात संवाद झालाच नाही. मुख्यमंत्र्यांनी बोलूनही पाण्याचा विसर्ग झाला नाही. पंतप्रधानांशी बोलल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू झाला’, असं पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, ‘लातूर भूकंपावेळी स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून, त्यांना पर्यायी जागा दाखवून त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलं होतं. तशा प्रकारचा प्रयत्न राज्य सरकारने करायला हवा’, असं देखी पवार म्हणले.

मदतीचं नियोजन करण्याची गरज

‘मला अनेक ठिकाणी लोकांनी सांगितलं की आता अन्नच पाठवू नका. शिजवलेलं अन्न पाठवण्याऐवजी गहू, तांदूळ, ज्वारी, मसाले यांचे पॅकेट्स पाठवले, तर त्याचा उपयोग होईल. गादी, चादर, सतरंजी, भांडी असं घरातलं साहित्य देखील मदत म्हणून पाठवणं गरजेचं आहे. ही सगळी मदत नियोजन करण्याची गरज आहे. राज्य सरकारने प्रत्येक गावी महसूल खात्याचा एक अधिकारी नेमावा. जो मदत म्हणून येणाऱ्या वस्तूंची नोंदणी करेल आणि त्यांचं वाटप व्यवस्थित करून घेईल’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.


हेही वाचा – पूरग्रस्त भागाला १०० टक्के कर्जमाफी द्या; शरद पवारांची मागणी

कागदपत्रांची व्यवस्था लावावी

‘पुराच्या पाण्यात अनेकांची कागदपत्र वाहून गेली. रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, बँकेचं पासबुक, शाळेचे दाखले, ७/१२ उतारे, खरेदी दस्त वाहून गेले आहेत. ते लवकरात लवकर आणि मोफत मिळण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्यासोबतच, पूरग्रस्तांचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना मदत करणं गरजेचं आहे. व्यापारी-कारागिरांना नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळायला हवी. त्यासोबतच खचलेले रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य समस्या, साथीचे रोग टाळण्यासाठीची स्वच्छता मोहीम या गोष्टींमध्ये प्रामुख्याने लक्ष घालण्याची गरज आहे’, असं पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 14, 2019