ज्यांना राफेलची कागदपत्रे सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार – शरद पवार

धड राफेल विमानाच्या खरेदीसंबंधीची कागदपत्रे सांभाळू शकत नाही, तर देशाचे संरक्षण काय करणार', असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

Mumbai
sharad pawaqr
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार धड राफेल विमानाच्या खरेदीसंबंधीची कागदपत्रे सांभाळू शकत नाही, तर देशाचे संरक्षण काय करणार’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधानांना लगावला आहे. तसेच ‘राफेलची किंमत वाढली असून जी रिलायन्स कंपनी ही विमाने बनवणार आहे, त्यांना जमीन दिली असतानाही ते अद्याप फॅक्टरी उभी करु शकलेले नाहीत. तसेच कर्मचारीवर्ग नियुक्त केलेला नाही. साधे कागदी विमानसुद्धा ते अद्याप बनवू शकले नसल्याची’ टीकाही त्यांनी केली आहे.

भ्रष्टाचार दडपण्यासाठी कागदपत्रांच्या चोरीचा बनाव

ठाणे लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साधला आहे. त्यावेळी त्यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला असून राफेलमध्ये झालेला भ्रष्टाचार दडपण्यासाठी कागदपत्रांच्या चोरीचा बनाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. कागदपत्रे चोरीला गेली, मग पोलिसात तक्रार का केली नाही, असाही सवाल त्यांनी केला आहे. बोफोर्स प्रकरणाची ज्या पद्धतीने चौकशी झाली, त्याचप्रमाणे राफेलचीसुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नोटाबंदी देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवू शकते

नोटाबंदी ही देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारी बाब ठरु शकते, असे मोदींना सांगितले असतानाही देखील त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे छोट्यामोठ्या १५ लाख लोकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. तसेच बेकारी देखील वाढली असून अनेकांच्या नोकऱ्या ही गेल्या, याला जबाबदार भाजपा-शिवसेना युतीचेच सरकार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘ना मैं खाऊंगा, ना मैं खाने दूंगा’ असे मोदी सांगायचे. परंतु, त्यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा आकडा पाहता, त्यांनी स्वत:च खाल्ले असून जनतेला मात्र उपाशी ठेवले आहे.

तसेच येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला संपूर्ण ताकदीनिशी काम करायचे असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचे आहे, असे पवार यांनी पदाधिकाऱ्यांना बजावले आहे. व्होटिंग मशीनमध्ये काही बिघाड असला, तर त्यासाठी जागता पहारा ठेवला पाहिजे. बुथस्तरावरील प्रत्येक कार्यकर्त्यांवर ४० ते ५० मतदारांची जबाबदारी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातील मतदार हा जाणता आणि असुरक्षित आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.


वाचा – शरद पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद

वाचा – कल्याणमध्ये उमेदवाराची शोधाशोध; शरद पवार व्हर्च्युअल संवाद साधणार


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here