घरताज्या घडामोडीशिर्डी बंद अखेर मागे, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर ग्रामस्थांचा निर्णय!

शिर्डी बंद अखेर मागे, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर ग्रामस्थांचा निर्णय!

Subscribe

शिर्डी ग्रामस्थांनी पुकारलेला शिर्डी बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर पुढील दिशा ठरवली जाईल, असं देखील सांगण्यात आलं आहे.

रविवारी पूर्ण दिवस पुकारण्यात आलेला शिर्डी बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. आज रात्री १२ वाजेपासून हा बंद मागे घेण्याची घोषणा शिर्डी ग्रामसभेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक होणार असून त्या बैठकीत जो निर्णय होईल, त्यावरून पुढची दिशा ठरवली जाईल, असं देखील ग्रामस्थांकडून स्पष्ट करण्यात आलं. या बंदसंदर्भात शिर्डी ग्रामसभेची बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘पाथरी हे साईबाबांचं जन्मगाव आहे’, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर दोन्ही गावांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर शिर्डीमध्ये निषेध म्हणून बंद पाळण्यात आला होता. त्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला आहे.

काय ठरलं ग्रामसभेमध्ये?

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंद मागे घेण्यासंदर्भात विनंती केल्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या २ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. जर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर भविष्यात पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात येईल. सर्वधर्मसमभावाची शिक्षण देणाऱ्या साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख साई चरित्रामध्ये देखील नाही. पाथरीच्या लोकांसंदर्भात आम्हाला चर्चा करायची नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सकारात्मक नाही झाली, तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल. बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी विधान मागे घ्यावं, अशीच आमची भूमिका आहे’, अशी भूमिका शिर्डी ग्रामस्थांकडून जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

वाचा सविस्तर  – साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद चिघळला!

दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत भेटीसाठी राधाकृष्ण विखे पाटील, सदाशिव लोखंडे आणि ग्रामसभेतील इतर मान्यवर ग्रामस्थ असे सुमारे ६० ते ७० जण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -