लॉकडाऊनमुळे शिर्डी साईबाबा मंदिराचे उत्पन्न कमी पण ऑनलाइन देणगीत वाढ

यावर्षी मंदिराचे उत्पन्न १७४ कोटी रुपयांनी कमी झाले.

जागतिक महामारी कोरोना विषाणूमुळे लागू केलेल्या लॉकडॉऊनचा प्रसिद्ध शिर्डी साई बाबा मंदिराच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील अहमदनगरमधील या प्रसिद्ध मंदिराच्या कमाईवर नकारात्मक परिणाम झाला आहे. परंतु ऑनलाइन माध्यमातून मंदिरात येणाऱ्या देणगीत वाढ झाली आहे. कोविड -१९ च्या निर्बंधामुळे हे मंदिर भाविकांसाठी १७ मार्चपासून बंद करण्यात आले आहे.

श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कन्हुराज यांनी असे सांगितले, “यावर्षी १७ मार्च ते ३१ ऑगस्ट दरम्यान मंदिराला ११५.१६ कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षी याच काळात हे उत्पन्न २८९.५५ कोटी रुपये होते. म्हणजे यावर्षी मंदिराचे उत्पन्न १७४ कोटी रुपयांनी कमी झाले आहे. लॉकडाऊन दरम्यान रोख देणगी १८.३२ लाख रुपये तर एफडीवरील ९४. ३९ कोटी रुपये व्याजातून आले असल्याचे सांगितले आहे.

त्यांनी असेही सांगितले की, या काळात ट्रस्टला ऑनलाइन देणग्यांद्वारे ११.४७ कोटी रुपये मिळाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ट्रस्टला ऑनलाईन माध्यमातून केवळ १.८९ कोटी रुपये मिळाले होते. तसेच गेल्या वर्षी मंदिर संस्थानाला ८.८६ किलो सोन्याचे आणि १९४ किलो चांदीचे दागिने प्राप्त झाले होते, परंतु या वर्षी लॉकडाऊन दरम्यान मंदिराला केवळ १६२ ग्रॅम सोनं आणि २.६ किलो चांदी मिळाली असल्याचे सांगितले.


‘बाबरी पाडणारे आम्हीच आहोत’; कंगनाच्या ‘बाबर सेना’ टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर