घरमहाराष्ट्ररायगडावर शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा!

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा!

Subscribe

किल्ले रायगडावर शनिवारी सकाळी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा साधेपणाने, मात्र उत्साहाने साजरा झाला. यंदा करोनामुळे दरवर्षीसारखा जोश नव्हता आणि गगनभेदी घोषणाही घुमल्या नाहीत. मात्र, दाट धुक्यांनी वेढलेल्या रायगडात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यात आली तेव्हा मात्र मोजक्या कार्यकर्त्यांनी ‘जय शिवाजी, जय जिजाऊ’चा केलेला जयघोष रायगडाच्या दर्‍याखोर्‍यातून गुंजला. यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर उत्साह ओसंडून वाहत होता…

यंदा करोनामुळे दरवर्षीसारखा जोश नव्हता. दरवर्षी ६ जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक दिन पंचवीस ते तीस हजार शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साधेपणाने करण्याचा निर्णय खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केला. त्यानुसार ते निवडक कार्यकर्त्यांसह शुक्रवारी गडावर पोहोचले. शनिवारी सकाळी ७ वाजता युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर खासदार संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सुवर्णनाण्यांचा अभिषेक घालण्यात आला.
शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी सर्वांचे आभार मानले. करोनाच्या पार्श्वभूमीवर करोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या काहींचा यावेळी मानपत्र देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याने या भागातील वीजपुरवठा बंद होता.

- Advertisement -

६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. यानिमित्ताने दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी दुर्गराज रायगडावर हे सोहळा संपन्न होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक तसेच शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -