कंगनाच्या थयथयाटावर शिवसेनेची आगपाखड

अभिनेत्री कंगना रानौतचा थयथयाट दिवसेंदिवस वाढत चालला असून मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्यापर्यंत तिची मजल गेली आहे. हे कमी म्हणून की, काय तिने आता लोकांचे बाप काढायला सुरुवात केल्यानंतर शिवसेना तिच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. मुंबई, नाशिक तसेच ठाण्यात कंगनाच्या पोस्टरला जोडे मारून ते जाळण्यात आले. यामुळे चवताळलेल्या कंगनाने मी मुंबईत येतेय, कुणाच्या बापाची हिंमत असेल तर मला रोखून दाखवा. यावर तू मुंबईत कशी येतेस तेच आता आम्ही बघतो, असा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना मुंबईत आली तर शिवसेनेच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून कंगनाविरुद्ध शिवसेना असे ट्विटर युद्ध सुरू आहे. मात्र कंगनाने विरोधाची खालची पातळी गाठल्यामुळे समाजातील सर्व स्तरांतून तिचा निषेध केला जात आहे. मुंबई, मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर टीका करताना कंगनाचा हा विरोध नसून थयथयाट असल्याचे दिसत आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून कंगनाने आधी मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्यापासून हे प्रकरण तापायला सुरुवात झाली. सुशांतची आत्महत्या नसून हत्याच आहे, असे सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचे तिने सांगितलं. यावरून खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असे विधान केले.

याच विधानाचा विपरित अर्थ घेत त्याला धमकी ठरवून कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. जी मुंबईसह महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. त्यावर अनेक मराठी, हिंदी, कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस आदी अनेक कलाकारांचा समावेश आहे. अनेकांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचे यात म्हटले आहे. नेटकर्‍यांनी मात्र कंगनाच्या या वक्तव्याचा यथेच्छ समाचार घेतला. तर भाजप समर्थकांनी कंगनाला पाठिंबा दिला. भाजप समर्थक आणि मुंबईप्रेमी आमनेसामने भिडल्याचं चित्र यात दिसत होते. भाजप नेते राम कदम यांनी कंगनाला झाशीची राणी म्हटले होते. यावरूनही शिवसेनेने राम कदम यांचा समाचार घेतला आहे. ईशान्य मुंबई महिला आघाडीच्या वतीने राम कदम यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली आहेत.

असे असतानाच शुक्रवारी कंगनाने आणखी एक ठिणगी टाकली. मला मुंबईला येण्यावरून धमकावले जात आहे. आता तर मी मुंबईत येणारच. येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मी मुंबईला येणार आहे. वेळ मी कळवेनच. कुणाच्या बापाची हिंमत असेल तर त्यांनी मला रोखून दाखवावे असे आव्हान तिने दिले आहे.

यावर मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. हे वचन, अशी टीका करत संजय राऊत यांनी ट्विटरवरून कंगनावर निशाणा साधला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मी मुंबईत येणारच. येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मी मुंबईला येणार आहे. वेळ मी कळवेनच. कुणाच्या बापाची हिंमत असेल तर त्यांनी मला रोखून दाखवावे- अभिनेत्री कंगना रानौत

मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. हे वचन– संजय राऊत ,खासदार शिवसेना