घरमहाराष्ट्रशिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याचा विषयात आता अर्थ नाही - पंकजा मुंडे

शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याचा विषयात आता अर्थ नाही – पंकजा मुंडे

Subscribe

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता एक वर्षाचा काळ लोटला आहे. मात्र अजूनही अधुनमधून शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येणार असल्याचे बोलले जाते. यावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र वेगळेच भाष्य केले आहे. शिवसेना आणि भाजप हे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेत आता अर्थ उरलेला नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. शिवसेनेसोबतची युती २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी तुटली होती. तसेच आताच्या विधानसभा निवडणुकीनंतरही युती तुटलेली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला स्थापन होऊन आता एक वर्ष झालेला आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेंना आता अर्थ उरला नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पंकजा मुंडे या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी युतीवर भाष्य केले.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) आठवा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज विविध पक्षाच्या नेत्यांनी स्मृतीस्थळावर हजेरी लावली होती. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर असल्यामुळेच मी त्यांना अभिवादन करण्यासाठी आले. बाळासाहेब हे सर्वांचे आहेत. गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मुंडे कुटुंबासाठी बाळासाहेब हे आदरणीय आहेत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

- Advertisement -

भाजप-शिवसेना युती होणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणत असल्या तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र महायुतीतील तीनही पक्षांनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत त्यांनी ट्विट करत, “बाळासाहेबांच्या स्वप्नातील शिवशक्ती-भीमशक्ती आणि भाजपची एकजूट आम्ही साकारली होती. पण नंतरच्या काळात ती एकजूट तुटली याची खंत वाटते. भविष्यात पुन्हा ती एकजूट व्हावी, हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल!”, असे ट्विट आठवले यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -