स्थानिकांचा विरोध असूनही श्रीकांत शिंदे कल्याणमध्ये कसे जिंकले?

कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा निवडूण आले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत त्यांच्यापुढे मोठे आव्हान होते. या शिवाय स्थानिक आग्री समाजाने राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार बाबाजी पाटील यांना पाठिंबा दर्शवला होता. परंतु, तरीही शिवसेनेचा विजय झाला आहे.

Kalyan
Shiv sena candidate Shrikant shinde win in kalyan constituency
स्थानिकांचा विरोध असूनही श्रीकांत शिंदे कल्याणमध्ये कसे जिंकले?

संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने निर्विवाद यश मिळवीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत. आघाडीचे बाबाजी पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे. कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. यंदाच्या निवडणुकीतही शिवसेनेने बालेकिल्ला अबाधित ठेवला आहे. मतमोजणीच्या पहिल्या राऊंडपासूनच महायुतीचे उमेदवार डॉ. शिंदे हे १८ हजाराच्या मताधिक्याने आघाडीवर होते, शेवटपर्यंत ते आघाडीवर होते.

एकनाथ शिंदेची प्रतिष्ठा पणाला

शिवसेनेने शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली हेाती. त्यामुळे एकिकडे सेनेचा नेता आणि दुसरीकडे वडील अशी दुहेरी भूमिका शिंदे यांना उठवावी लागली. शिंदे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले होते. तर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्याही प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आघाडीतील अनेक नेतेमंडळी उतरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटील यांनी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाकडे अधिक प्रचार केला तर शिंदे यांनी शहरी आणि ग्रामीण असा दोन्ही परिसर पिंजून काढला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे कार्यकत्यांना बळ कमी असल्याने प्रचारात कमी पडली.

आगरी कार्ड फेल ठरलं

बाबाजी पाटील हे आगरी समाजाचे आणि स्थानिक उमेदवार होते. श्रीकांत शिंदे हे ठाणे येथे राहत असल्याने स्थानिक विरूध्द बाहेरचे असाही प्रचार रंगला होता. सुरवातीपासूनच ही निवडणूक एकतर्फी होणार, असे चित्र निर्माण झालं होतं. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीने ‘आगरी’ कार्ड खेळत समाजाला भावनिक आव्हान केले होते. आगरी समाजाच्या मतांची दोन्हीकडून खेचाखेची रंगली हेाती. मात्र समाजाच्या नावावर किंवा समीकरणावर मते मागणाऱ्या राष्ट्रवादीला लोकांनी नाकारलं, त्यामुळे आगरी समाजाच्या मतांची विभागणी मोठया प्रमाणात असल्याने आगरी कार्ड फेल ठरल्याचे दिसून आले.

सेनेच्या विजयाची कारणे

१ श्रीकांत शिंदे यांना खासदारकीचा अनुभव
२ केद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामे
३ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र
४ उच्चविद्याभुषित उमेदवार
५ महायुतीमुळे विजय सोपा

ठाण्याच्या विजयातही एकनाथ शिंदेंचे मोठे योगदान

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांचा पराभव झाला. त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी खुप मेहनत केली होती. परंतु त्यांना ठाण्यात यश मिळवता आले नाही. याशिवाय ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. अखेर तुल्यबळ लढतीची अपेक्षा असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यामान खासदार राजन विचारे यांनी लाखोंचे मताधिक्य घेऊन अगदी सहज विजय मिळविला. ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी पूर्ण ताकदीनिशी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र वरकरणी अतितटीची होईल, असे वाटणाऱ्या या लढतीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संघटन कौशल्याची सरशी झाली. त्यांनी पक्षांतर्गत मतभेद मिटवून सेनेची सारी ताकद राजन विचारे यांच्या पाठीशी उभी केलीच, शिवाय भाजप कार्यकर्त्यांनाही सोबत घेतले.