घरमहाराष्ट्रपालकमंत्री बदलण्याची शिवसेनेची मागणी धूसर!

पालकमंत्री बदलण्याची शिवसेनेची मागणी धूसर!

Subscribe

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेला द्या, या मागणीसाठी वादळ उठले असले तरी ते चहाच्या पेल्यातीलच ठरू शकते. महाविकास आघाडी सरकार आता कुठे स्थिरस्थावर व्हायला सुरुवात होत नाही तोच शिवसैनिकांची मागणी श्रेष्ठी मान्य करून पालकमंत्री बदलतील ही शक्यता तूर्त धूसर आहे.

शिवसैनिकांना पालकमंत्री शिवसेनेचा मिळेल अशी अपेक्षा होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मूळचे रायगडचे असलेले सुभाष देसाई यांचे नाव त्यासाठी घेतले जात होते. पालकमंत्री पदाबाबतही जिल्हा शिवसेनेच्या पदरी निराशा आली आणि पुन्हा आदिती तटकरे यांनीच बाजी मारली. ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाला पालकमंत्री पद दिले जाईल, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा दाखला देत शिवसैनिकांनी तटकरे यांना मिळालेल्या पालकमंत्री पदाबद्दल उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आणि मंगळवारी रोहे येथे झालेल्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीतही त्याचे पडसाद उमटले. सुरुवातीला राजीनाम्याची भाषा झाली होती, त्यात मात्र तथ्य नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. परंतु शिवसैनिकांची नाराजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानी घालण्यासाठी तीन आमदार आणि अन्य पदाधिकारी येत्या एक-दोन दिवसात मातोश्रीवर जाणार आहेत.

- Advertisement -

पक्षाची भक्कम स्थिती असलेल्या रायगडातील शिवसैनिकांत असलेली नाराजी परवडण्यासारखी नाही हे लक्षात घेऊन गोगावले यांना कॅबिनेट किंवा राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले पक्षाच्या कोट्यातील एखादे महामंडळ दिले जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच अन्य दोन आमदार, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे, यांच्यापैकी एकाची एखाद्या महत्त्वाच्या मंडळावर नियुक्ती होण्याचीही शक्यता आहे. रायगड जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस-शेकापसोबत जायचे नाही, हा शिवसेनेचा निर्धार जवळजवळ नक्की असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे राज्यातील मित्र इथे वेगवगळ्या चुली मांडणार, हे आता तरी स्पष्ट होत आहे. किंबहुना त्याचमुळे पालकमंत्री पदाला महत्त्व आलेले असावे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -