भाजपने वाल्यांना आयात केले – अनिल परब

आमदार प्रशांत परिचारक यांना वेतन देण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत राम कदम यांच्याच वक्तव्याची चर्चा झाली. बैठकीनंतर सेनेचे नेते अनिल परब यांनी परिचारक आणि राम कदम यांच्यावर टीका केली.

Mumbai
BJP Prashant Parcharak and Ram Kadam
वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक आणि राम कदम

सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली निलंबित आमदार प्रशांत परिचारक यांना वेतन देण्यासंदर्भातील एक बैठक आज विधानपरिषदेत आयोजित केली होती. मात्र या बैठकीत प्रशांत परिचारक यांच्या वेतनाची चर्चा होण्याऐवजी राम कदम यांच्या वक्तव्याचीच चर्चा झाल्याचे कळत आहे. याबाबत माहिती देताना शिवसेनेचे गटनेते अनिल परब म्हणाले की, “भाजपने सगळीकडच्या ‘वाल्यांना’ आपल्या पक्षात घेतले आहे. प्रशांत परिचारक असो किंवा राम कदम यांनी आपले अशुद्ध गुण उधळले आहेत. आमदार राम कदम यांच्या दहीहंडी कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते, त्यामुळे भाजपच्या कोणत्याही नेत्याने आतापर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत.”

आजच्या बैठकीला चंद्रकांतदादा पाटील, अनिल परब, हेमंत टकले आणि कपिल पाटील उपस्थित होते. इतर पक्षाचे गटनेते गैरहजर असल्यामुळे निर्णय पूढे ढकलला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगत राम कदम यांच्याविषयी बोलणे टाळले.

परिचारकांना वेतन देण्याबाबत नियम तपासून घेऊ

शिवसेनेचे गटनेते अॅड. अनिल परब म्हणाले की, विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे दिड वर्षापूर्वी निलंबन केलेले आहे. त्यामुळे त्यांना कोणत्या नियमाच्या आधारे वेतन आणि भत्ते दिले जात आहेत, या नियमांची तपासणी आम्ही करु आणि त्यानंतर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करू. पण आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुढच्या बैठकीत नियमांची तपासणी करून निर्णय घेतला जाईल, असे आजच्या बैठकीत ठरले आहे.

परिचारक आणि कदम यांची वादग्रस्त वक्तव्ये

प्रशांत परिचारक हे भाजप पुरस्कृत आमदार आहेत. सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून ते भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुक प्रचारसभेत त्यांनी सैनिकांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर एकच गजहब उडाला. विधानपरिषदेतही याचे पडसाद उमटले त्यानंतर त्यांचे दीडवर्षासाठी निलंबन केले गेले होते. आता भाजपचेच आमदार राम कदम यांनी देखील महिलाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here