घरमहाराष्ट्रशिवसेनेने 2014 मध्ये दिला होता काँग्रेसकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव

शिवसेनेने 2014 मध्ये दिला होता काँग्रेसकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव

Subscribe

मुंबई=महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग करून शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न नवीन नसून २०१४ साली देखील शिवसेनेने काँग्रेसकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव मांडला होता, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये चव्हाण यांनी याबाबत खुलासा केला आहे. मात्र आम्ही निवडणुकीत पराभूत झालो असल्याने विरोधातच बसू, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रस्ताव फेटाळला असल्याचे म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, २०१४ साली देखील भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसकडे पाठिंबा मागितला. त्यांनी माझ्याकडे संपर्क साधला होता. मात्र त्यावेळी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास सोनिया गांधी इच्छुक नव्हत्या. त्यामुळे आम्ही सदर प्रस्ताव फेटाळून लावला होता. २०१९ मध्ये मात्र परिस्थिती वेगळी होती. यावेळी देखील सोनिया गांधी आणि काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी अनुकूल नव्हती. मात्र चर्चा पुढे गेली असल्यामुळे निर्णय घ्यावा लागला.

- Advertisement -

भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचाही प्रयत्न झाल्याचा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. भाजप-सेनेत वाद निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राला पर्यायी सरकार देण्यासाठीच यावेळी शिवसेनेसोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीचा जन्म झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. भाजपविरोधात निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली होती. त्यावेळीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडीचा प्रस्ताव दिला होता. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करून भाजपला सत्तेतून दूर करावे, असा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव मी फेटाळून लावला होता.2014 नंतर परिस्थिती खूप बदलली आहे. भाजपने मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी केली.

एकहाती सत्ता मिळावी व विरोधी पक्ष संपावेत यासाठी भाजपने प्रयत्न केले. अशा परिस्थितीत भाजपकडे पुन्हा सत्ता गेली असती तर राज्यातील लोकशाही संपुष्टात आली असती. म्हणूनच मी पर्यायी सरकारची कल्पना मांडली. तसेच भाजप आणि शिवसेनेत तीव्र मतभेद झाल्यावर पर्यायी सरकार प्रत्यक्षात यावे यासाठी पुढाकार घेतला. माझ्या या कल्पनेला सुरुवातीला विरोध झाला. मात्र मी आग्रह कायम ठेवला. सर्व आमदारांशी बोललो. अल्पसंख्याक नेत्यांशी चर्चा केली. भाजप आपला नंबर एकचा शत्रू आहे आणि त्याला रोखणे गरजेचे आहे हे सर्वांना पटवून दिले, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -

शिवसेनेचा मात्र इन्कार
२०१४ मध्ये तसा काही प्रस्ताव दिल्याचे आपल्याला माहिती नाही. पृथ्वीराज चव्हाण तशा प्रस्तावाबाबत बोलत असतील, तर त्यांनी हा प्रस्ताव देताना उपस्थित असणार्‍यांची नावे उघड करावीत, चव्हाण हेच याबाबत अधिक माहिती देऊ शकतात, असे सल्याचे शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनेही इन्कार केला. शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नव्हता, असे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -