‘रश्मी ठाकरे त्यात कधी पडल्या नाहीत’, शिवसेनेचे अमृता फडणवीसांना जोरदार उत्तर

अमृता फडणवीस आणि रश्मी ठाकरे

वास्तूविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार टीका सुरु केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून जमीन खरेदी केली असल्याचे सांगत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या आरोपांना आता विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नीलम गोऱ्हे यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेत सांगितले की, “गाणे म्हणणे, चेहरा बदलणे, नको ती विधाने करणे यात रश्मी ठाकरे कधी पडल्या नाहीत.” तसेच गोऱ्हे यांनी राम कदम आणि किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली. मुलींना उचलून आणू म्हणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहेत, हा सर्वात मोठा विनोद असल्याची टीका त्यांनी केली.

किरीट सोमय्या हे जेवणातील लोणच्याप्रमाणे सतत नवीन विषय काढतात. रवींद्र वायकर यांनी सोमय्यांना पाणचट म्हटल्याचे ऐकले. हे वाक्य सोमय्या यांना लागू पडतो, अशी टीका गोऱ्हे यांनी सोमय्या यांच्यावर केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शपथपत्रात जमीन व्यवहारांची माहिती दिलेली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी एका महिन्यात पुरावे सादर करावेत, अन्यथा जे आरोप केले त्याबद्दल माफी मागावी, असे आव्हान देखील गोऱ्हे यांनी दिले आहे.