‘अर्णब गोस्वामी तीनपाट, सुपारीबाज पत्रकार’, मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखाबद्दल शिवसेना हक्कभंगासाठी आक्रमक

Arnab Goswami
अर्णब गोस्वामी

महाराष्ट्राचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन अवमान केल्याबद्दल रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात विधानसभेत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग दाखल केला आहे. या प्रस्तावाला संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी अनुमोदन दिले. “अर्णब गोस्वामी सुपारी घेऊन काम करत असून त्याने फक्त मुख्यमंत्र्यांचाच नाही तर महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा अपमान केला आहे, त्यामुळे त्याला शिक्षा दिलीच पाहीजे”, अशी भूमिका परब यांनी मांडली

सुशांत सिंह प्रकरणाच्या वार्तांकन करताना वाहिन्यांची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत लोकशाहीची थट्टा करण्याचे काम सुरु आहे. यापुर्वी पत्रकार लोकशाहीची कधीही थट्टा करत नव्हते. मात्र रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीवरील अँकर अर्णब गोस्वामी महाविकास आघाडीतील मंत्र्यांचा जाणूनबुजून एकेरी उल्लेख सुरु केला आहे. या कृतीबद्दल गोस्वामी यांचा निषेध व्यक्त करुन त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.

प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग दाखल केल्यानंतर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी देखील अर्णब गोस्वामी यांच्याव टीका केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायपालिका, प्रशासन, कायदे मंडळ आणि माध्यमांना त्यांची चौकट आखून दिली आहे. प्रत्येकाने आपापल्या चौकटीत काम करावे, असे संकेत आहेत. एकमेकांच्या चौकटीत हस्तक्षेप न करता ते एकमेकांसाठी सुसंगत असल्या पाहीजेत. मात्र आता रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी जी न्यायाधीशाची भूमिका घेतली असून ते स्वतःच ट्रायल चालवत आहेत.”, अशी टीका अनिल परब यांनी केली.