घरदेश-विदेशशिवसेना,राष्ट्रवादी नेत्यांना धमकी देणार्‍यास केली अटक

शिवसेना,राष्ट्रवादी नेत्यांना धमकी देणार्‍यास केली अटक

Subscribe

कोलकातामध्ये मुंबई पोलिसांनी शोधून काढले

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात हस्तक्षेप करू नये, अशी धमकी देणारा कॉल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोलकाता येथून पलाश नरेंद्रनाथ बोस (वय 49) याला अटक करण्यात यश मिळवले. पलाशच्या केलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, पलाशने राज्यसभेचे शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकी दिल्याची कबुली दिली आहे. याच गुन्ह्यांत त्याला रविवारी शिवडी येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे जुहू एटीएसचे प्रमुख पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले.

काही दिवसांपासून संजय राऊत यांना दुबईहून एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी दिली होती. वारंवार फोन करून तो त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. आपण दाऊद भाईचा जवळचा सहकारी असल्याचे सांगत होता. त्यामुळे संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांकडे धमक्यांबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. या गुन्ह्यांचा समांतर तपास एटीएस अधिकारीही करीत होते. तपासादरम्यान संबंधित कॉल कोलकाता येथून येत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दया नायक यांच्यासह त्यांच्या पथकातील दशरथ विटकर, सचिन पाटील, सागर कुंजीर, सचिन पुराणिक आणि कंक यांनी कोलकाता येथून पलाश बोस या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

- Advertisement -

चौकशीत त्याने संजय राऊत यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनाही अशाच प्रकारे दाऊदच्या नावाने दुबईहून धमकी दिल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल, एक लॅपटॉप, एक भारतीय सिमकार्ड, तीन दुबईतील सिमकार्ड जप्त केले आहे. लॅपटॉप आणि मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. पलाश हा कोलकाता येथील टॉलीयंग, लेन क्रमांक तीन, रुसा रोडच्या 4 ए मध्ये पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता. तो विज्ञान शाखेचा पदवीधर असून नोकरीनिमित्त तो 19 वर्षांपासून दुबईत कामाला होता. काही महिन्यांपूर्वीच तो दुबईहून कोलकाता येथे आला होता. त्याची पत्नी शिक्षिका असून दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. पलाश हा सुशांत सिंग राजपूतचा फॅन असल्याचे बोलले जाते.

सुशांत आत्महत्या प्रकरणात राजकीय ढवळाढवळ करू नका असे त्याने आपल्या कॉलद्वारे संबंधित राजकीय नेत्यांना धमकी दिली होती. धमकी देताना तो दाऊदचा उल्लेख करीत होता. दुबईत वास्तव्यास असल्याने त्याचे दाऊदशी तसेच त्याच्या कुठल्या सहकार्‍याशी संबंध आले आहे का, त्याचे गुन्हेगारी आणि धागेदोरेबाबतही आता पोलीस तपास करीत आहे. सोशल साईटवरून त्याने काही राजकीय नेत्यांचे मोबाईल तसेच त्यांच्या निवासातील क्रमांक मिळविले होते. त्यानंतर एका अ‍ॅपच्या माध्यमातून तो धमकी देत होता. उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख वगळता इतर कोणत्याही राजकीय नेत्याला त्याने धमकी दिली नाही. तसेच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत उघडकीस आले आहे. धमकी देण्यामागे त्याचा उद्देश काय होता, त्याच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक दया नायक यांनी वर्तविली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -