अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेच्या नाराजीचे ग्रहण!

Alibaug
shiv sena mla mahendra dalvi criticized aditi tatkare
राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरेंना रायगडचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेनेत नाराजी

महाविकस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री पदापाठोपाठ रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळविण्यात यशस्वी झालेल्या श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांना शिवसेनेच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा पालकमंत्री हे सूत्र राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तीन आमदार असताना देखील पालकमंत्री पद राष्ट्रवादीला दिल्याने रायगड जिल्हा शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यात राज्यमंत्रिपद राष्ट्रवादीला दिल्यानंतर पालकमंत्रिपद शिवसेनेला द्यायला हवे होते, अशी भावना शिवसेनेने व्यक्त करीत रायगड जिल्हा पालकमंत्री पद बदलासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा प्रभाव आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते निकटवर्ती मानले जातात. त्यामुळे राजकीय प्रभावातून मुलगी आमदार अदिती तटकरे यांच्यासाठी राज्यमंत्रिपदासह रायगडचे पालकमंत्री पद देखील मिळविण्यात यशस्वी झाले. मात्र, सदर बाब शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रुचलेली नाही. त्यामुळे मित्र पक्षाच्या रोषाला सोबत घेऊन अदिती तटकरे कशा काम करतील हा मोठा प्रश्न आहे.

संपूर्ण देशाला भाजपा विरोधी ताकद देण्याची राजकीय घटना ज्या महाराष्ट्राने घडवत राजकीय चमत्कार घडवला आणि ५६ आमदारांच्या जिवावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनतर झालेल्या मंत्रिपदाच्या वाटपात मात्र महाआघाडीच्या सर्वच नेत्यांची नाराजी खातेवाटपावरून झाल्याचे सध्यातरी चित्र आहे.
जिल्ह्यात सर्वांत जास्त ज्या पक्षाचे आमदार त्याचाच पालकमंत्री असे गणित मांडलेल्या मंत्रिमंडळ आणि पालकमंत्री वाटपात रायगड जिल्हा मात्र अपवाद ठरला. रायगड जिल्ह्यात महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले तिसऱ्यांदा जिंकून आले. अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी शेकापला पराजित करून पहिल्यांदा शिवनेनेला आमदार दिला. कर्जतमध्ये महेंद्र थोरवे जिंकून आले. असे असताना श्रीवर्धन मधून राष्टवादीला एकमेव आमदार मिळाला. मात्र तरी देखील पालकमंत्री पद न मिळाल्याने रायगड जिल्हा शिवसेना अस्वस्थ झाली आहे. मंत्रिपद नको पण पालकमंत्री पद तरी द्या, अशी आक्रमक भुमीका घेत आपल्या पदांचे राजीनामे देण्यासाठी पदाधिकारी सज्ज झाले आहेत.

मंत्रिपद नाही तर पालकमंत्री पद तरी शिवसेनेला देण्याची भावना शिवसैनिकांची आहे, ज्याचे आमदार जास्त त्याचा पालक मंत्री असे खुद्द उपमुखमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. मग रायगड मध्ये असे का घडले ? असा सवाल सामान्य शिवसैनिकांचा आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे १८ जिल्ह्यापरिषद सदस्य आहेत, सहा पंचायत समित्या , तीन नगरपालिका , दोन नगरपंचायत , सव्वा तीनशे ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आहेत. मुख्यमंत्री आपले आहेत, मात्र पालकमंत्री नाही तर पालकमंत्री तरी द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केली.

शिवसेनेचे रायगडमध्ये तीन-तीन आमदार जिंकून आले. त्यामुळे शिवसेनेला पालकमंत्री पद मिळणे हे न्यायिक होते. राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळाले याचे आम्हाला दुःख नाही, आमचे साहेब मुख्यमंत्री आहेत. मात्र पालकमंत्री शिवसेनेला मिळायला हवे होते. सुनील तटकरे यांची बार्गेनिंग पॉवर जास्त ठरते. – शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी

रायगडमध्ये शिवसेनेला पालकमंत्री मिळण्याच्या भावना शिवसैनिकांच्या आहेत. मात्र , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळणे हे आमचे कर्तव्य असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान , राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आम्हांला एकत्र काम करायचे आहे. त्यामुळे याबाबत मी भाष्य करू इच्छित नाही, अशी सावध प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी आपलं महानगरशी बोलता दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here