शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईनच

शिवाजी पार्कवरील परंपरा यंदा खंडित , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार सोशल मीडियाद्वारे शिवसैनिकांना मार्गदर्शन

shiv sena dussehra rally
दसरा मेळावा

देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाने अनेक प्रथा, परंपरा मोडित निघाल्या. राजकारणातही शिवसेनेची शिवतीर्थावर दसरा मेळावा साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे. सेनेच्या इतिहासात या दसरा मेळाव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण कोरोनाचे संकट असल्यामुळे यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा होण्याची शक्यता आहे. राज्यात अनलॉक करण्यात येत असला तरी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जात आहेत. राज्य सरकारने लोकल सेवा, जिम, सिनेमागृह अजून सुरू केलेली नाहीत. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर राज्यभरातून होणारी गर्दी टाळण्याकडे शिवसेना नेतृत्वाचा कल आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंपासून या मेळाव्याला महत्त्व आहे.

बाळासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी लाखो लोक राज्यभरातून जमत असत. बाळासाहेबांची भाषणांची शैली, अभिनय, अधूनमधून शिव्या आणि विरोधकांवर टीका ही सैनिकांना हवीहवीशी वाटणारी होती. दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांच्या भाषणातून लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटत. प्रथा आणि परंपरेनुसार दसरा मेळाव्यात पहिल्यांदा शस्त्रपूजा केली जाते. त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची भाषणे होत असे आणि सर्वात शेवटी बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करत. यंदाही दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची आधी भाषणे होतील, मग रात्री ८ वाजता उद्धव ठाकरे भाषण करतील.

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर यंदाचा पहिलाच दसरा मेळावा आहे. हा दसरा मेळावा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे नियोजन शिवसेना नेत्यांचे होते. मात्र, कोरोनामुळे आता ते शक्य होणार नाही. महाविकास आघाडीच्या सरकारचाही हा पहिलाच दसरा आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसैनिकांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी तसेच सरकारची कामे, शिवसैनिकांना पुढची दिशा देण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा मानला जातोय.

गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेवर विरोधकांकडून चिखलफेक करण्यात आली. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू, अर्णब गोस्वामी आणि कंगना रानौतचे प्रकरण या सर्वांवर उद्धव ठाकरे शांत होते. या प्रकरणावरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप होता. पण उद्धव ठाकरेंनी अतिशय संयमी भूमिका निभावली. पण आपण मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून काही विषयांवर बोलणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यामुळे या तीन प्रकरणांवर उद्धव ठाकरे काय बोलणार हे उत्सुकतेचे असणार आहे.

आतापर्यंत दोनदा मेळावा रद्द

इतिहासात दोन वेळा दसरा मेळावा रद्द करण्यात आला होता. पहिल्यांदा २००६ मध्ये प्रचंड पाऊस आल्यामुळे आणि दुसरा २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत मेळावा पुढे ढकलला होता. देशात व राज्यात कोरोनाचे संकट उभेच आहे. अनेक सण-उत्सव कोरोनामुळे रद्द करावे लागले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी जमू नये यासाठी शासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन मेळावा साजरा केला जाणार आहे.