घरताज्या घडामोडीगिते, बागुल यांनी बांधले शिवबंधन

गिते, बागुल यांनी बांधले शिवबंधन

Subscribe

नाशिकचा महापौर हा शिवसेनेचाच होणार : खा.संजय राऊत

नाशिक ।

भाजपचे नेते माजी आमदार वसंत गिते आणि सुनील बागुल यांनी शुक्रवारी सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. गेल्या अनेक दिवसांपासून हे नेते शिवसेनेच्या संपर्कात होते. मुख्यमंत्र्यांनीही बागुल आणि गीते यांच्या प्रवेशावर आनंद व्यक्त केला. या दोघा नेत्यांच्या शिवसेना प्रवेशाने नाशिकमध्ये भगवी शाल अधिक उबदार अन तेजस्वी बनेल असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

- Advertisement -

राउत म्हणाले, आज नाशिकमध्ये वसंत गिते आणि बागुल प्रवेश करत आहेत. आम्ही सतत एकमेकांशी बोलत आहोत. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर देखील गिते व बागुल यांची चर्चा झाली. त्यानंतर प्रवेश निश्चित झाला. आज त्यांचा प्रवेश होतो आहे. हे दोन्ही नेते सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेतील. मुंबईमध्ये त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. नाशिक पुन्हा एकदा शिवसेनेचा गड अभेद्य बनावा याकरीता यांचे योगदान महत्वाचे राहणार आहे. गिते आणि बागुल यांना आम्हाला नवीन नाही. आमच्यात परकेपणा नाही. मी व्यक्तीशः गिते व बागुल यांचे परिवारात मनापासून स्वागत करतो. नाशिकमधील शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकार्‍याने अन शिवसैनिकाने त्यांचे येण्याचे स्वागत केले आहे. प्रवेशावेळी अनेक मतभेद असतात परंतु यांच्या प्रवेशाबाबत कोणतेही मतभेद दिसून आले नाही असे ते म्हणाले.

भाजपचे काही नगरसेवक संपर्कात असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, अनेकजण संपर्कात आहेत. नाशिकमध्ये प्रवाह बदलतो आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बदल निश्चितपणे दिसेल. संभाजीनगर नामकरणाबाबत ते म्हणाले, विमानतळाला धर्मवीर संभाजीराजे विमानतळ असे नाव द्या असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. मात्र भाजपचे लोक विमानतळ नामरकणाचा प्रस्ताव का मानत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसवाले काही औरंगजेबाचे भक्त नाही. बिहारमध्ये औरंगाबाद नावाचा मोठा जिल्हा आहे. त्या जिल्हयाचेही नामांतर करावे अशी मागणी होते आहे मग त्याबाबत काय भुमिका आहे हे भाजपने स्पष्ट करावे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नामांतर करणार नाही अशी भुमिका घेतली आहे याबाबत भाजपचे नेते काहीच बोलत नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांनी तशी भुमिका कधीच घेतली नाही.

- Advertisement -

दिनकर पाटील यांनी घेतली भेट
महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी विशेष शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यामुळे वसंत गिते आणि सुनील बागुल यांच्यापाठोपाठ दिनकर पाटीलही भाजपला रामराम ठोकतात की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. दीड वर्षांपूर्वी पाटील यांचे पालिकेतील सभागृहनेते पद काढून घेतल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाटील पक्ष बदलाचा निर्णय घेऊ शकतात असे बोलले जाते. मात्र आपल्या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता असे दिनकर पाटील यांनी आपलं महानगर शी बोलताना स्पष्ट केले.

काय म्हणाले राऊत 
राज्यपाल नियुक्ती रखडणे हा महाराष्ट्राचा अन घटनेचा अपमान
नाशिकमध्ये प्रवाह बदलतोय
राज्य सरकार पाच वर्ष टिकेल.
नाशिक पुन्हा सेनेचा बालेकिल्ला
मुंबईत त्यांची जबाबदारी निश्चित होईल.
नाशिकचा महापौर सेनेचाच होणार
शेतकरी आंदोलनाबाबत केंद्राने मार्ग काढावा.
जुने शिवसैनिक पुन्हा येताहेत.
ममता अन भाजपला लढू द्या सद्या
राज्यपालालांनी घटनेचा खून करू नये.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -