घरमहाराष्ट्रशिवसेना ११० तर भाजप १६० जागा? पहिल्या फेरीत फॉर्म्युल्यावर चर्चा!

शिवसेना ११० तर भाजप १६० जागा? पहिल्या फेरीत फॉर्म्युल्यावर चर्चा!

Subscribe

शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाच्या चर्चेची पहिली फेरी बुधवारी पार पडली.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात पक्षांतरं करणाऱ्या नेतेमंडळींना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मात्र, हे सर्वजण ज्या शिवसेना आणि भाजपमध्ये दाखल होत आहेत, तिथे त्यांना तिकीट मिळेल का? हे मात्र या दोन्ही पक्षांच्या जागावाटपानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच या नेतेमंडळींचे अच्छे दिन अल्पकालीन ठरण्याची शक्यता आहे. याच जागावाटपाची चर्चा करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीची पहिली बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. यामध्ये शिवसेना आणि भाजपला मिळून २७० जागा आणि मित्रपक्षांना १८ जागा अशा युतीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मित्रपक्षांच्या जागांवर एकमत होईना!

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतल्यापासून ‘आमचं ठरलंय’ हा एकच धोशा लावला आहे. पण नक्की काय ठरलंय? हे मात्र सांगायला दोन्हीही पक्षांची नेतेमंडळी तयार नाहीत. शिवाय जर ठरलंय, तर चर्चेच्या फेऱ्या का सुरू आहेत? हे मात्र मतदारांना कळेनासं झालं आहे. त्यातच युतीच्या चर्चेची पहिली फेरी झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप दोघांना मिळून २७० जागा घेणार असून मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडण्यावर विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या २७० पैकी कोण किती जागा लढणार? यावर मात्र दोन्ही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचं समजतंय. शिवाय, मित्रपक्षांना कुणी किती जागा सोडायच्या? यावर देखील एकमत होत नसल्याचं समजतंय.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – नारा ‘युती’चा पण मुलाखती सर्वच मतदारसंघात!

१६०हून एकही जास्त जागा भाजपला नाही?

दरम्यान, शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना भाजपला १६० पेक्षा एकही जास्त जागा द्यायला तयार नाही. म्हणजेच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ११० जागांवर लढण्यास तयार असल्याचं समजतंय. या चर्चेसाठी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन तर शिवसेनेकडून सुभाष देसाई सहभागी झाले होते. आता पुढच्या फेरीमध्ये पुन्हा एकदा दोन्ही पक्षांच्या आपापसांतील जागांची संख्या आणि मित्रपक्षांना सोडायच्या जागांच्या संख्येवर देखील चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -