घरमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

Subscribe

कल्याणमध्ये मेट्रो भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. पण, या कार्यक्रमावर शिवसेनेनं मात्र बहिष्कार टाकला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईहून कल्याणला जाणार आहेत. त्यावेळी कल्याणमध्ये मेट्रो भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. पण, या कार्यक्रमावर शिवसेनेनं मात्र बहिष्कार टाकला आहे. शिवसेनेला भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेकडून सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. अशी माहिती आता समोर येत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचा सोहळा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्या कार्यक्रमाचं निमंत्रण शिवसेनेनं भाजपाला दिलं नव्हतं. त्यावेळी शिवसेना – भाजपमधील नाराजी नाट्य समोर आलं होतं. दरम्यान, कल्याणनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याला दाखल होणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता भाजपकडून विकास कामांचा धडाका लावला जात असल्याचं चित्र देखील दिसून येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी जवळपास ४१ हजार कोटींच्या योजनांची घोषणा करणार आहेत.

राष्ट्रवादीची टिका

दरम्यान, कल्याण मेट्रो भूमिपूजनावर राष्ट्रवादी काँग्रेसनं टिका केली आहे. ठाणे – भिवंडी-कल्याण या मेट्रोसाठी निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. त्यानंतर देखील भूमिपूजन करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. शिवाय, भाजप खासदाराचा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मेट्रोचा मार्ग ठरवण्यात आल्याची टिका देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. तसंच प्रस्तावित मार्ग हा तोट्याचा असेल असं देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे.

- Advertisement -

लालचौकी स्मशानभूमी बंद 

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी कल्याणला येत आहेत. यावेळी कल्याणमधील वासुदेव बळवंत फडके मैदानावर त्यांची सभा होणार आहे. मात्र, त्याला लागून असणारी लालचौकी स्मशानभूमी महापालिकेने आज सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवली आहे. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच या स्मशानभूमीचा दरवाजा बंद झाल्याने कल्याणकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमादरम्यान लालचौकी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यावेळी  एखादे पार्थिव अंत्यसंस्कारारासाठी आले तर त्याला बैलबाजार स्मशानभूमीत अंत्ययात्रा नेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र हे अंतर खूप लांब असल्याने नागरिकांची फरपट होणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास मोदी कल्याणमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे तब्बल दीड तास लालचौकी स्मशानभूमी बंद राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -