आयुष मंत्रालयाच्या प्रकल्पावरुन काँग्रेस-शिवसेनेत जुंपली

सिंधुदुर्गातील प्रकल्प काँग्रेसचे मंत्री लातूरला पळवत असल्याचा आरोप

mp vinayak raut and amit deshmukh

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रकल्प पळवापळवीचं काम सुरु आहे. सिंधुदुर्गातील प्रकल्प काँग्रेसचे मंत्री पळवत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी गावात इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन रिसर्च प्रकल्प होत आहे. त्यासाठी एमआयडीसीने ६० एकर जागा देखील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन रिसर्चला दिली आहे. हा प्रकल्प सिंधुदुर्ग ऐवजी लातूरला व्हावा अशी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची इच्छा आहे. त्यासाठी अमित देशमुख प्रयत्नशील आहेत. यावरुन विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अमित देशमुख यांनी स्वर्गीय वडिलांकडून काही गुण घ्यावेत, असा सल्ला विनायक राऊत यांनी दिला आहे.

“केंद्रीय आयुष मंत्रालयाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनल प्लांट हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळीमध्ये दिला आहे. दरम्यानच्या काळात हा प्रकल्प जळगावसाठी व्हावा असं सूचित केलं होतं. मात्र, केंद्राने नकार देत हा प्रकल्प सिंधुदुर्गासाठी नक्की केला आहे. या प्रकल्पाचे अभिप्राय राज्य सरकारकडून मागितलेले आहेत. दरम्यान, स्थानिक पातळीवर तयारी झाली असताना तसंच अभिप्राय तयार झालेला असताना अचानकपणे हा प्रकल्प लातूरला तु्म्ही द्या, असं मंत्र्यांच्या सहीने राज्य सरकारकडून केंद्राला पत्र पाठवण्यात आलं. मी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या भेटीसाठी अनेकवेळा प्रयत्न केले. पत्र देखील पाठवलं. मात्र, आम्हाला एकदाही भेट दिली नाही. परस्पर अशा पद्धतीने प्रकल्प पळवणं हे त्यांना शोभा देणारं नाही, असं विनायक राऊत म्हणाले.