शुद्ध भगवा कुणाचा हे जनताच ठरवेल; संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

shivsena mp sanjay raut slams devendra fadnavis

मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्याचा निर्धार व्यक्त करताना बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्वावरच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, शंभर पिढ्य़ा आल्या तरी शिवसेनेच्या भगव्याला हात लावणे शक्य नाही, असेही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी २०२२ साली मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकणार आहे आणि तो भाजपचा असेल असे म्हणत शिवसेनेला ललकारले. याला उत्तर देताना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला असे वाटत असेल की आता जो भगवा फडकत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा, तो शुद्ध नाही आणि ते जे भगवा कुठला घेऊन येत आहेत तो शुद्ध आहे, त्याचा निर्णय जनता घेईल. मुंबईची सर्वभाषिक जनता घेईल, असे संजय राऊत म्हणाले. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. वारंवार जेव्हा जेव्हा केंद्राकडून, दिल्लीच्या राजकारण्यांकडून संकट आले आहे, तेव्हा तेव्हा मुंबईतला मराठी माणूस रस्त्यावर उतरुन रक्त सांडले आहे. त्यामध्ये शिवसैनिक फारमोठ्या प्रमाणामध्ये आघाडीवर आहे. ज्यांना मुंबईवर शुद्ध भगवा फडकवायचा आहे त्यांनी या इतिहासाचा अभ्यास करायला हवा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. मुंबईवर काहीजण दुसरा भगवा फडकवतायत, आमच्यासाठी एकच भगवा आहे, तो शिवरायांचा भगवा आहे. तो गेली ५० वर्षे मुंबई महापालिकेवर जनतेने फडकवलेला आहे. केंद्रातील लोकांना मुंबई महाराष्ट्रातच ठेवायची नाही आहे. मुंबईवर जो भगवा फडकला आहे, शिवसेनेचा, मराठी माणसांचा, त्याची तुम्हाला अडचण होत आहे. मुंबईत भाजपची सत्ता आली तर मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकते.

एक कोणीतरी नटी आहे, पालिकेने तिचे कार्यालया तोडले बघा, ती भाजपची कार्यकर्ती आहे, असे संजय राऊत यांनी कंगना राणावत हिचे नाव न घेता निशाणा साधला. ती नटी मुंबईच्या पोलिसांना माफिया म्हणते, मुंबईच्या जनतेविषयी उलटसुलट बोलते, ती मुंबईला पीओके म्हणते म्हणजे पाकिस्तान म्हणते. मुंबईतली, राज्यातली जनता उसळून उठली तिच्याविरुद्ध पण तिच्या समर्थनार्थ कोण तर ज्यांच्याकडे शुद्ध भगवा आहे ते तिच्यासाठी रस्त्यावर उतरले. पुढे बोलताना संजय राऊत यांनी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी याच्यावर देखील निशाणा साधला आहे. एक कोणीतरी अँकर आहे, टिव्ही चालवतो, त्याच्यावर मराठी आर्किटेक्ट यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे म्हणजे त्याच्यावर खूनाचा आरोप आहे. आम्ही सगळे अन्वय नाईक यांच्या पाठीशी उभे आहोत. पण भाजपचे लोक एका अमराठी माणसाठी रस्त्यावर येत आहेत. हे तुमचे मराठीपण, हा भगवा. हा भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही. भगवा जो आज फडकतोय तो कधीच उतरला नाही. म्हणजे तुम्ही आता भगवा उतरवायचे काम करताय, म्हणजे तुम्हाला युनियन जॅक फडकवायचे आहे, ब्रिटीशांप्रमाणे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.