घरमहाराष्ट्रभाजपचे आऊटडेटेड नेते निलेश राणेंनी शुद्धीत बोलावे, विनायक राऊतांचा पलटवार!

भाजपचे आऊटडेटेड नेते निलेश राणेंनी शुद्धीत बोलावे, विनायक राऊतांचा पलटवार!

Subscribe

नाणार अरबी समुद्रात बुडवल्याच्या कितीही चर्चा झाल्या, तरी नाणारचं भूत महाराष्ट्राच्या डोक्यावरून उतरण्याचं नाव घेत नसल्याचंच वारंवार समोर येत आहे. भाजपचे माजी खासदार आणि नेते निलेश राणे यांनी नुकताच जाहीर पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात शिवसेनेवर एक गंभीर आरोप केला होता. नाणार प्रकल्पाच्या (Nanar Refinery) बाधित परिसरात देशमुख नावाच्या उद्धव ठाकरेंच्या मावस भावाने १४०० एकर जमिनीचे व्यवहार परप्रांतीय खरेदीदारांना करून दिल्याचा हा आरोप होता. त्याला आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी तेवढ्याच तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपचे आऊटडेटेड नेते निलेश राणेंनी अभ्यास करून शुद्धीत बोलावं. तुम्ही कितीही मिटक्या मारा, पण नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेला हा शब्द आहे’, असं राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे नाणारवरून पुन्हा एकदा कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना अशी खडाजंगी पाहायला मिळत आहे. (Nilesh Rane)

नाणार बुडाला की तरंगला?

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या आधी नाणार प्रकल्प हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हा सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने देखील नाणारविरोधी भूमिका घेतल्यामुळे सत्ताधारी भाजपवर दबाव टाकण्यात यश आलं आणि नाणार स्थगित करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देखील नाणार होणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे ‘नाणार बुडाला’ असंच सगळ्यांना वाटलं. पण आता निलेश राणेंच्या आरोपांमुळे तोच नाणार पुन्हा समुद्रातून वर आला की काय, असं वाटू लागलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले विनायक राऊत?

निलेश राणेंच्या आरोपांना उत्तर देताना राऊतांनी (Shivsena MP Vinayak Raut) भाजपवरच दलालीचा आरोप केला. ‘रिफायनरीच्या कंपनीसोबत अनेक बैठका मंत्रालयात आणि वर्षावर होत आहेत. हे बेताल वक्तव्य आहे. निलेश राणेंच्या आरोपाला आम्ही कवडीची किंमत देत नाही. ते अभ्यास करून आणि शुद्धीत बोलत नाहीत. देशमुख, मोदी, शाहा, गुजराती भूमाफिया या कुणाचीही फिकीर न करता नाणार रद्द करण्याचं धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं आहे’, असं राऊत म्हणाले. यासंदर्भातला एक व्हिडिओ त्यांनी जारी केला आहे. ‘रिफायनरी होणार म्हणून तुम्ही सगळे मिटक्या मारत बसला आहात. ज्यांनी ज्यांनी दलाली केली, त्यांना प्रकल्प हवा आहे. कोरोना आला तरी चालेल. पूर्ण रत्नागिरी जिल्हा भूकंपप्रवण क्षेत्रात आलाय. तो आला तरी चालेल, पण यांची दलाली वाचायला हवी. भूमाफियांकडून घेतलेले पैसे यांच्या बोकांडी बसायला नकोत म्हणून यांना ही रिफायनरी हवी आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही रिफायनरी होऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. तुम्ही फक्त मिटक्या मारत बसा’, असं देखील विनायक राऊत या व्हिडिओत म्हणत आहेत.

- Advertisement -

काय आरोप आहेत निलेश राणेंचे?

शिवसेनेने नाणारविरोधी आंदोलन करतानाच दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे मावस भाऊ असलेले निशांत देशमुख नाणार बाधित जमिनींचे व्यवहार करून देत होते असा आरोप निलेश राणेंनी केला आहे. निशांत सुभाष देशमुख संचालक असलेल्या सुगी डेव्हलपर्सने हे व्यवहार करून दिले असून त्यात बहुतांश परप्रांतीय खरेदीदार असल्याचं देखील ते म्हणले आहेत. ऋतुजा डेव्हलपर्स या पुण्याच्या कंपनीने देखील नाणार बाधित ९०० एकर जमिनीत गुंतवणूक केली असून त्यात ८० टक्के खरेदीदार परप्रांतीय आहेत, असा दावा निलेश राणेंनी केला आहे. (BJP Leader Nilesh Rane)


वाचा सविस्तर – नाणार प्रकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाची १४०० एकर जमीन; निलेश राणेंचा आरोप
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -