शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकरांना आमदारकी

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांमध्ये करंजकरांचा समावेश, शिक्कामोर्तब बाकी

Vijay Karanjkar

विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची निवड होत असून, शिवसेनेच्या यादीत नाशिकचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना संधी मिळाली आहे. अर्थात, राज्यपालांनी अजूनही अंतिम सदस्यांची नावे घोषित केलेली नसल्यामुळे त्याला दुजोरा मिळालेला नाही. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना प्रत्येकी चार जागा मिळणार असल्याने सेनेच्या कोट्यातून करंजकर संधी मिळल्याचे पक्षातील नेत्यांकडून बोलले जात आहे.

कला, साहित्य, सांस्कृतिक, सहकार आदी क्षेत्रात प्राविण्य मिळवणार्‍या व्यक्तिंना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी दिली जाते. राज्यपालांकडे ही यादी सुपुर्द करण्यात आली आहे. यात शिवसेनेच्या कोट्यातून जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना संधी मिळाली आहे. जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी आणि करंजकर या दोघांची नावे या यादीत पहिल्यापासून होती. पक्षाशी एकनिष्ठ आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्याऐवजी खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वत: विजय करंजकर यांना थोडे सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. त्याचे फलित म्हणून त्यांना ही आमदारकी मिळाल्याचे समजते.