हातात कागद घेऊन गिधाडासारखा फडफडतोय; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबावर केलेल्या गंभीर आरोपानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

संजय राऊत आणि किरीट सोमय्या

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबावर केलेल्या गंभीर आरोपानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘खुलासा कोणी आणि कशासाठी करावा हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी असणारे प्रवक्ते सांगणार नाहीत. आमच्या मराठी भगिनीचे कुंकू पुसले गेले आहे. त्या स्वत: आणि त्यांची कन्या गेले अनेक महिने न्यायासाठी आक्रोश करत आहेत. त्याच्यावरती शेठजींच्या पक्षाचे हे व्यापारी प्रवक्ते बोलायला तयार नाही. कोण आहे हा माणूस? याला काय माहिती आहे. २०१४ सालचा कायदेशीर व्यवहार. नुसता हातात कागद घेऊन गिधाडासारखा फडफडतोय’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

‘आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा तपास भरकटवण्यासाठी, तपासाची दिशा बदलण्यासाठी हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते असे फालतू मुद्दे घेऊन समोर येत आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. म्हणजे त्या बाईचं कुंकू पुसलं तरी चालेल. मराठी माणसाने केलेला व्यवहार यांच्या डोळ्यात खुपतोय का? म्हणे २१ व्यवहार केले. हा तर खोटारडेपणाचा कळस आहे. ही त्यांना वॉर्निंग आहे. त्यांनी अशी कितीही फडफड केली तरी महाराष्ट्राचे सरकार हे पाच वर्ष चालणारच आहे. आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय देण्याची आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्याची आहे. शेठजीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे, म्हणून अशी फडफड करत आहेत. त्यांनी कितीही फडफड केली तरी काही निष्पन्न होणार नाही,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अर्णब गोस्वामी कोण लागतो तुमचा?

‘ही निराशा, वैफल्य आहे. अर्णब गोस्वामी याला अटक करण्यात आली. त्यावेळी तुम्ही त्याला भेटण्यासाठी तुरुंगात जाता, आंकांडतांडव करत आहात. कोण लागतो तो तुमचा? आणि ती महिला तुमची कोणीही लागत नाही. तिचा नवरा आणि सासू मेली आहे. ते तुमचे कोणीही लागत नाहीत. हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. हे ढोंगी, भंपक, खोटारडे, बनावट लोक आहेत’, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.


हेही वाचा – ठाकरे कुटुंबासोबत केलेल्या जमीन व्यवहारावर अन्वय नाईक कुटुंब म्हणाले…